छत्रपती संभाजीनगर : ठरावीक वयानंतरच मधुमेह होतो, असे म्हणणे चुकीचे ठरत आहे. कारण लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ अशा सर्वांनाच मधुमेह गाठत आहे. प्रत्येकाला हा आजार होण्याचे कारण वेगवेगळे आहे. त्यातून अनेक दुष्परिणाम होतात. मात्र, योग्य काळजी घेतली तर मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
घाटीतील मेडिसिन विभागप्रमुख डाॅ. मीनाक्षी भट्टाचार्य म्हणाल्या, मधुमेहाच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आता दुपारचीही ओपीडी सुरू झाली आहे. ओपीडीत मधुमेह रुग्णांची तपासणी केली जाते. घाटीत येणाऱ्या रुग्णांमध्ये ४५ ते ६० वर्षे वय असलेले ६० टक्के रुग्ण असतात. तर ३० ते ४५ वर्षे वयोगटाचे १५ टक्के रुग्ण असतात. मधुमेह असलेल्या बालकांवर बालरोग विभागात उपचार होतात.
तरुण वयातच गाठतोय मधुमेहएका अभ्यासात छत्रपती संभाजीनगरसह देशभरात झालेल्या ३५ वर्षांखालील २ लाख २५ हजार ९५५ व्यक्तींच्या तपासणी मोहिमेत मधुमेहाचे प्रमाण तपासले. यातून ३५ वर्षांखालील, ३० वर्षांखालील आणि २५ वर्षांखालील व्यक्तींमध्ये मधुमेहाचे प्रमाण अनुक्रमे १७.९ टक्के, १३.३ टक्के आणि ९.८ टक्के आढळले. मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्यांमध्ये याच वयोगटात मधुमेहाचे प्रमाण अनुक्रमे ४०.१ टक्के, ३१.८ टक्के आणि २६.४ टक्के आढळले. हा अभ्यास तरुणांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अत्यंत जास्त असल्याचे दर्शवितो. विशेषत: मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींमध्ये वयाच्या १८ व्या वर्षापासूनच मधुमेहाची तपासणी करणे आवश्यक ठरते.- डाॅ. मयुरा काळे, मधुमेहतज्ज्ञ
‘स्लो पाॅयझन’सारखे दुष्परिणाममधुमेह हा ‘स्लो पाॅयझन’सारखे शरीरावर दुष्परिणाम करतो. पुन्हा पुन्हा त्वचेचे फंगल व विविध इन्फेक्शन होणे, लघवीचे इन्फेक्शन होणे, हार्ट अटॅक, किडनी खराब होणे, लकवा, डोळ्याच्या पडद्यावर, पायाच्या नसांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे शुगर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह व हार्मोन्सतज्ज्ञ
महिन्याला १५ ते २० नवीन बालमधुमेहीदर महिन्याला १५ ते २० नवीन बालमधुमेही येत आहेत. आजघडीला नोंद असलेल्या बालमधुमेहींची संख्या ही १,३५० झाली आहे. २५ वर्षांखालील तरुणांचाही समावेश आहे. ९० टक्के अंधत्व असलेली १५ वर्षीय मुलगी मधुमेहाच्या सर्व परिस्थितीवर मात करून पुढे जात आहे. बारावीत तिने ९४ टक्के मिळविले.- डाॅ. अर्चना सारडा, बालमधुमेहतज्ज्ञ
वृद्धांची काळजी घ्यावीमधुमेह असलेल्यांचे हिमोग्लोबीन ‘ए१सी’ या चाचणीचे प्रमाण ६ पेक्षा कमी असणे योग्य समजले जाते. परंतु वृद्धांमध्ये मधुमेहाच्या उपचारामुळे हायपोग्लॅसेमिया, रक्तातील साखर कमी होऊन त्याचे दुष्परिणाम होणे, हे अधिक धोकादायक असते. यासाठी अशा व्यक्तींचे हिमोग्लोबिन ‘ए१सी’ हे ७ ते ८ च्या मध्ये असले तरी अधिक कमी करण्याचे प्रयत्न करू नये.- डाॅ. मंगला बोरकर, प्राध्यापक, वार्धक्यशास्त्र विभाग, घाटी