पाचोड : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड गावासह तालुक्यातील विविध गावात मानवी वस्त्यांमध्ये व शेतात घुसून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडून तातडीने जेरबंद करण्याचे निर्देश वनमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
बिबट्याचा बंदोबस्त करण्यासंदर्भात रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी वनमंत्री संजय राठोड यांची प्रत्यक्ष भेट घेतली. याची तातडीने दखल घेत वनमंत्री संजय राठोड यांनी विधान भवनात बैठक घेतली व वनाधिकाऱ्यांना निर्देश दिले.
पैठण तालुक्यातील पाचोड, लिंबगाव, थेरगाव, मुरमा, रांजणगाव दांडगा, आडगाव जावळे, आंतरवाली खांडी, विहामांडवा आदी गावात बिबट्याने धूमाकूळ घातला. त्याच्या हल्ल्यात आतापर्यंत आपेगाव शिवारातील एक वयोवृद्ध आणि त्यांच्या नातवांचा मृत्यू झाला. तसेच काही जनावरेही मृत्युमुखी पडली आहेत. बिबट्याचा शोध घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक प्रकाश महाजन यांनी वन विभागाचे अधिकारी एस.बी.तांबे , वनपाल मनोज कांबळे , वनरक्षक सतीश तळेकर आदी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने पाचोड परिसरातील विविध गावात पाठविले होते. सर्वत्र बिबट्याचा शोध घेतला गेला. पण बिबट्या काही आढळून आला नाही.