औरंगाबाद : जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. त्यामुळे उपाययोजनांकडे लक्ष वेधत लसीकरणाला गती देण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्यांनी करत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी. वेळेवर उपचार, तपासणी, लसीकरण करण्याचे प्रशंसनीय काम काम जिल्हा परिषदेची यंत्रणा करत आहे. तसेच त्यांना प्राथमिक सुरक्षा साधने, सोयी सुविधा उपलब्ध करून देताना त्यांचे वेतन वेळेवर होईल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना सदस्यांनी प्रशासनाला केल्या.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची बैठक शुक्रवारी दुपारी जिल्हा परिषद अध्यक्ष मीना शेळके यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पद्धतीने पार पडली. तांत्रिक अडचणींचा सामना करत सदस्यांनी आपल्या सूचना बैठकीत मांडल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांच्यासह सदस्य, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
बैठकीच्या सुरुवात होण्यापूर्वी आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडून समजावून अडचणी जाणून घेतल्या. वाॅररुमची हेल्पलाइन सुरू केली. त्याची माहिती अद्याप सदस्यांनाच नाही तर लोकांना कशी काय मिळणार? असा सवाल उपस्थित करत ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने बाधित रुग्ण शहरात उपचारासाठी येताहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन होईल अशी व्यवस्था करण्याची मागणी महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा ठोंबरे यांनी केली. चर्चेचे अनुपालन अप्राप्त म्हणून दाखविल्याने सदस्य मधुकर वालतुरे यांनी नाराजी व्यक्त करत सिंगी येथे आरोग्य केंद्र उभारण्याची गरज व्यक्त केली.
जितेंद्र जैस्वाल यांनी जलजीवन मिशनमधून योजनांचे सर्वेक्षणाला सुरुवात झाली नसल्याकडे लक्ष वेधले, तर किशोर पवार यांनी कन्नड येथील शिवराई पाणीटंचाईतून मुक्त करण्याची मागणी बैठकीत केली, तर रमेश पवार यांनी कनिष्ठ भुवैज्ञानिकांमुळे अडलेल्या कामांचा आढावा सादर करून रखडलेली टंचाईच्या कामांना गती देण्याकडे लक्ष वेधले.