लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : अडीच महिन्यांपासून रिक्त असलेल्या शहराच्या पोलीस आयुक्तपदी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांची नियुक्ती झाली आहे. ते मंगळवारी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. मिटमिटा येथे ७ मार्च रोजी कचऱ्याच्या कारणावरून झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना शासनाने १५ मार्च रोजी एक महिन्याच्या सक्तीच्या रजेवर पाठविले. तेव्हापासून पोलीस आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडेच आहे. चिरंजीव प्रसाद यांच्या बदलीचे आदेश शासनाने सोमवारी जारी केले.समस्यांचा डोंगरऔरंगाबादच्या पोलीस आयुक्तपदी रुजू होणा-या प्रसाद यांच्यासमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. जानेवारी ते ११ मेपर्यंत शहरात झालेल्या विविध दंगलींमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेची घडी पुन्हा व्यवस्थित बसवावी लागेल. खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार, बलात्कार, महिलांवरील अत्याचार, घरफोड्या आणि वाहन चो-यांनी कळस गाठल्याने सामान्य जनता त्रस्त आहे. वाहतूक पोलिसांना बेशिस्त वाहनचालक जुमानत नसल्याने सिग्नल तोडून पळणे, राँग साईडने धावणा-या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे.शहरातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेची घडी बसविण्यासोबतच गल्ली-बोळातील दादांना वेसण घालण्याचे काम नवीन पोलीस आयुक्तांना करावे लागणार आहे. भूखंड माफिया आणि दंगलीमागे असलेले खरे दोषी शोधून त्यांच्यावर कायद्याचा वचक बसविण्याचे आव्हानही चिरंजीव प्रसाद यांच्यासमोर असणार आहे.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद घेणार आज पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:25 AM