औरंगाबाद : राज्य शासनाने रस्त्यांसाठी दिलेल्या २४ कोटी ३३ लाख रुपयांच्या निधीतून कामे करण्याची निविदा मिळविताना ठेकेदाराने बोगस अनुभव प्रमाणपत्र जोडून निविदा प्रक्रियेत भाग घेऊन कंत्राट मिळविले. संबंधित ठेकेदारासह त्याला मदत करणाऱ्या महापालिकेतील अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी नगरसेवक विकास एडके यांनी विभागीय आयुक्तांकडे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी विभागीय आयुक्तांकडे यासंदर्भात वेगवेगळे अहवाल सादर केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल न्यायालयात शपथपत्रांसह दाखल झाला असून, या अहवालानुसार या कामात अनियमितता आढळून आल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. एडके यांनी २७ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अनियमिततेविषयी लेखी पुराव्यांसह तक्रार दिली आहे. ठेकेदाराने बोगस अनुभव प्रमाणपत्र जोडून निविदा मिळविल्याचा स्पष्ट उल्लेख करून पुरावेही जोडले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालात मात्र, या प्रमाणपत्रांचा उल्लेख नाही. निविदा नोटीसमधील अट क्रमांक १३, पोटकलम ५ नुसार व्हाईट टॅपिंगचा अनुभव असला पाहिजे. हे काम महापालिका हद्दीत केलेले पाहिजे व शहर अभियंत्यांच्या स्वाक्षरीचेच अनुभवाचे प्रमाणपत्र स्वीकारले जाईल, अशी स्पष्ट अट आहे. निविदेसोबत जोडलेले प्रमाणपत्र कार्यकारी अभियंता सिकंदर अली यांच्या स्वाक्षरीचे आहे. आश्चर्याची बाब म्हणजे सिकंदर अली यांनी या प्रमाणपत्रात जो रस्ता दाखविला आहे तो रस्ता कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्या अखत्यारीतील आहे. प्रमाणपत्रातील मजकूरदेखील खोटा असून, त्यात झालेल्या कामाची व प्रकल्पाची किंमत चुकीची दाखविली आहे. जेणेकरून ठेकेदारास काम मिळावे, अशी व्यवस्था करण्यात आली असल्याचा आरोप एडके यांनी केला आहे.
दोषींवर फौजदारी कारवाई करा
By admin | Published: September 07, 2016 12:11 AM