औरंगाबाद : परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कुठल्याही प्रक्रियांमध्ये न अडकता सरसकट दुष्काळ जाहीर करून पशुधन व फळबागा वाचविण्यासाठी, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.
चिखली येथे भारत बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहून शरद पवार हे औरंगाबादला आले होते. तिकडे जाण्यासाठी रात्री मुक्कामही औरंगाबादेतच केला होता. शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळावर पत्रकारांशी विस्ताराने चर्चा केली व सध्या माझे याच प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य आहे, असे ते म्हणाले.
सत्ताधारी अचाट कल्पना मांडत असतात. परदेशातून कडबा आणायला माझी काहीच हरकत नाही; पण यात वेळ किती जाईल? असा सवाल उपस्थित करून ‘आपण सर्वज्ञ आहात; पण जाणकारांचा सल्ला जरा घेत चला ना,’ असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
‘चाइल्डिश’ म्हणणार नाही कारण... पवार यांनी सांगितले की, आम्ही सत्तेत असताना दुष्काळ की दुष्काळसदृश, अशा शब्दांमध्ये अडकून न पडता तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करीत होतो. निर्णय घ्यायला उशीर लावत नव्हतो आणि शब्दांचा खेळ करीत बसण्याची ही वेळ नाही. सध्या लहान मुलांसारखे चालू आहे. याला मी ‘चाइल्डिश’ म्हणणार नाही. कारण मुख्यमंत्रीपदाची किंमत कमी होऊ नये,’ असाही टोला लगावायला पवार विसरले नाहीत.
साखर उत्पादनासाठी बीटची शेती फायदेशीर ऊस उत्पादनासाठी पाणी आणि कालावधीही जास्त लागतो. हे लक्षात घेऊन मागच्याच आठवड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे आम्ही फ्रान्स, नेदरलॅण्ड, स्पेन आणि बेल्जियम या देशांना भेटी देऊन आलो. तेथील बीटची शेती पाहिली. ती परवडणारी वाटली. सहा महिन्यांत बीट येते व तुलनेने पाणीही कमी लागते. शिवाय बीटमध्ये साखरेचे प्रमाणही १३ टक्केआहे. बीटपासून इथेनॉलही तयार करता येतो. हे फायदे लक्षात घेता येत्या महिनाभरात बीट शेतीचा अंतिम निर्णय आम्ही घेणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.
प्यायच्या पाण्यात वाद नको नगर-नाशिकच्या धरणांमधील पाणी जायकवाडीत सोडण्यावरून सध्या वाद सुरू आहे. राजकारण रंगले आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच शरद पवार उत्तरले, हे राजकारण नाही. तिकडच्या मंडळींना आपले पाणी आपल्याकडेच राहावे असे वाटू शकते; पण आज मराठवाड्याची परिस्थिती गंभीर आहे. प्यायला पाणी आताच उपलब्ध नाही. आणखी आठ महिने जायचे आहेत. अशावेळी राजकारण व वाद नको. हे मी नगर- नाशिककडे माझे ऐकणारी जी मंडळी असतील, त्यांना समजावून सांगणार आहे.