- कैलास पांढरेकेरळा ( औरंगाबाद ) : 'रात्रीची वेळ आहे...समजुन घ्याना...पाच दहा शिल्लक घ्या...पण पेट्रोल द्याना...' काही कलाकार मंडळी पेट्रोल पंपावर असा 'गोंधळ' घालत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सिल्लोड मार्गावरील एका पेट्रोल पंपावरील असून कोरोना जनजागृती करणाऱ्या कलाकारांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथे कोरोना जनजागृतीसाठी महाराष्ट्राची हास्य दिंडी युवामंच कलाकार जनजागृती कार्यक्रमासाठी गेले होते. रात्री उशिरा कार्यक्रम संपवून ते परत निघाले. रात्री बार ते एक वाजेदरम्यान अचानक पेट्रोल संपल्याने त्यांनी चिंचखेडा शिवारातील वज्रेश्वर पेट्रोल पंपावर धाव घेतली. यावेळी पेट्रोल पंपावर कोणीच नव्हते. त्यांनी कर्मचाऱ्यांना आवाज दिला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे या कलाकारांनी गांधीगिरी करत ढोलकीवर थाप मारली आणि आपल्या गाण्यातून पेट्रोलची मागणी केली.
''रात्री ची वेळ आहे ...समजुन घ्याना ...पाच दहा शिल्लक घ्या...पण पेट्रोल वाले दादा आम्हाला पेट्रोल द्याना...चोविस तास सेवा बँनरवर अस का लिहता...पोर सोर सोबत आहे, पेट्रोल वाले दादा आम्हाला पेट्रोल द्याना...पेट्रोल द्याना ...'' असा 'गोंधळ' त्यांनी पंपावर सुरु केला. अखेर कर्मचाऱ्यांनी पेट्रोल नसल्याचे कारण देत कलाकारांना पेट्रोल न देताच परत पाठवले. मात्र, याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. २४ तास सेवा असे पंपावर लिहिले असतानाही प्रबोधन करून सामाजिक कार्य करणाऱ्या कलाकारांना पेट्रोल मिळाले नसल्याने सोशल मीडियात अनेकांनी संताप व्यक्त केला.
दरम्यान, या व्हायरल व्हिडीओ बाबत महाराष्ट्राची हास्य दिंडी युवा मंचच्या कलाकारांनी आम्ही फक्त पंपावरील कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देत होतो असे सांगितले. रात्री अपरात्री पंपावर येणाऱ्या वाहनधारंकाना इंधन मिळावे यासाठी हे केले. तर पंप मालक जीवन फुके यांनी त्या रात्री पंपावरील यंत्रणेत बिघाड होता. शिवाय पंपही ड्राय होता. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोल देता आले नाही, असे स्पष्टीकरण दिले.