- शांतीलाल गायकवाड
पहाटं-पहाटं भान्याला जाग यायची ती, ‘गाडीवाला आया देखो कचरा निकाल, ओ भैया... ओ बहेना...’ या कचरा गाण्यानं. मात्र, मागच्या पंधरा दिवसांपासून तो नुसता बेचैन झालाय. त्याचं हे अलार्म बिघडल्यानं; पण आठवडाभरापासून या अलार्मची जागा पहाटेचा उग्र दर्प घेऊ पाहतोय. आज तर दर्पानं जरा जास्तच ‘किक’ लगावली व तो ताडकन गोधडीतून उठला.हाटेची त्याची प्रसन्नता त्या दुर्गंधीनं पार पळवून लावली. मग अंगाला आळोखेपिळोखे देत तो नाराजीनंच उठला. आज धुळवड. मस्त एन्जॉय करायची; पण कशी? भान्या कॉलेज तरुण. धडपड्या. सुधारणावादी. तेवढाच मनमौजी. त्याच्या डोक्यात भुंगा ताल धरून नाचत होता तो, रंगपंचमी अखेर कशी साजरी करावी या विचाराचा. ‘आज कुछ तुफानी करते हे,’ असे तो मनोमनी ठरवू लागला. त्या तंद्रीतच त्यानं सकाळचे विधी झटपट उरकले. मग अचानक सनक यावी, तशी त्यानं जोरात उडी मारली व टाळी वाजवली. चार-पाच सवंगड्यांना फोन लावून त्यानं बोलावून घेतलं.भान्याची टीम गोळा झाली. घोटगुळणा झाला अन् झिणझिण्या येताच त्यांनी घरातच ‘होळी रे होळी’ म्हणत जोरदार बोंब ठोकली. टीमनं तडक कुलगुरूंचं निवासस्थान गाठलं. ‘अज्ञान, अंधकाराच्या बैलाला भो...’ म्हणत सर्वांनी बोंब मारली. परिसरातील चीरशांती त्यांच्या बोंबांनी भंग पावली. महामहिम बाहेर आले. सर, बेरोजगार बोंबा मारताहेत. शिकून नोकºया मिळेनात अन् त्यात कोण त्या उपकुलसचिवांनी फसवलंय म्हणे नोकरीच्या नावानं. ‘बोला रे बोला, होम सेंटरच्या नावानं, देत कसे नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही...’ अशी जोरदार घोषणाबाजी झाली. सगळ्यांना शांत करीत भान्या म्हणाला, सर गावात सगळा कचरा झालाय. काय ते बघा. पुढचा दिल्ली दौरा झाला, की मीटिंग लावतो तुमची, असं महोदय म्हणताच, पोरं हुर्र्यो करीत निघाली.टोळकं विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमागून बीबी-का-मकबºयाच्या दिशेनं निघालं. वाटत सगळ्यांनीच नाकाला रुमाल लावले. ‘उघड्या’वर काही पोरं बसली व्हती. आयला, ‘ओपन डेफेकेशन’ अजूनही सुरूच, सालं कधी फ्री होऊ आपून,’ भान्या मनातच पुटपुटला. हिमायत बागीतून शिरून टोळी विभागीय आयुक्ताच्या रंगमहाली पोहोचली. घरातून गाण्याचे मादक सूर कानी पडत होते, ‘आहो हे गाव लयं न्यारं...’ भान्यानं हाताचा इशारा करताच सर्व जागीच थबकले. इनाम... इनाम... वतन... जमिनी... च्यायला काय चाललंय आत. रावसाहेबांचाही आवाज वाटतोय, एकानं शंका उपस्थित केली. आतून गुलाब, केवडा, मोगºयाचा दरवळ बाहेर येत होता. बाहेर साचलेल्या कचºयाच्या दर्पात तो दरवळ मिळून वेगळाच केमिकल लोचा झाला होता. तेथून जाता-जाता ही झुंड मनपा आयुक्तांच्या निवासस्थानी झाकती झाली. तिथं आयुक्तांनी छोटेखानी होळी पेटवलेली. समोर कागदायचा ढीग. एक-एक कागद वाचून ते सावकाश होळीत टाकत आणि आनंदी होत. ‘आरं ही मनपातील घोटाळ्याची कागदं तर नाहीत.’ भान्याचा मित्र म्हणाला. नाही, कचºयावर आतापर्यंत न्यायालयानं दिलेले ते आदेश असावेत, असं असंबंध बोलत भान्यानं सर्वांना, ‘कचºयाच्या बैलाला भो...’ म्हणून बोंब मारायला लावली व आयुक्त पाहतच राहिले.पुढं भडकलगेटसमोर काही मंडळी दुष्ट प्रवृत्ती, अंधश्रद्धा, वाईट चालीरीतीची आणि कचºयाची होळी पेटविण्यात व्यस्त होती. तेथून बाजूलाच आमदार निवासासमोर, ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ या गाण्यावर सुरू असलेल्या बारीक नाचकामाकडं दुर्लक्ष करीत भान्याची टीम रेल्वेस्थानकाकडं कूच करती झाली. महापोर बंगल्यासमोर कचºयाचे ढीग आणि आत होळीचा उत्साह ओसंडून वाहत होता. प्रत्येक जण रंगला-दंगला होता. एक तरतरी प्रत्येकात दिसत होती. भान्याचे साथीही मग तिथं थिरकू लागले. महापोर दादाही आले. स्पीकरवर जोरात गाणं वाजत होतं, ‘पब्लिकला हे दिलं निमंत्रण हातात कैची धरा... मह्या शिटीची कॉस्मेटिक सर्जरी करा... अहो महापोर, अहो आमदार, अहो खासदार...’ काळजात ‘कचरा’ घुसल्यागत महापोर अधूनमधून नृत्यझटके देत होते. एका माजी महापोरांनी मग मध्येच ‘अगं... अगं... अगं... कचरा झोंबला’ म्हणत भारूड सादर केलं अन्य एकानं ‘तु... पे... तुपे...’ म्हणत ‘लाटलं भूखंडाचं श्रीखंड’ अशी गवळण गायली. अशी एकापेक्षा एक गण, गवळण , बतावणी अन् लावणीची बहार सोडून भान्याचं पथक पुढं निघालं.बन्सीलालनगराच्या चौकात साहित्यातील कचºयावर तर्र चर्चा रंगलेली. कुणी म्हणतंय, ‘कचºयाचं फक्त नाव असतं... घरातल्या घरात वसलेलं एक गाव असतं...’ तर कुणी म्हणतंय, कचºयावर लिव्हा मग एखादी सुंदर कादंबरी. मी सतत प्रस्ताव मागवतोय सर्जनशील लेखकाकडून; पण काय कचराच. मी शासनाचा पुरस्कार देतो. या साहित्याच्या भानगडीत पडणंच नको, असं पुटपुटत भान्यानं टीमला इशारा केला. एव्हाना टीमचं ‘चार्जिंग’ उतरत आलेलं. समोर ‘नंदनवन’ पाहून त्यांच्या जीवात जीव आला.‘होळीचं सोंग घेऊन,लावू नको लाडीगोडी,रंग नको टाकू माझी,भिजल कोरी साडी...’हे मस्त गाणं ऐकून ‘रिचार्ज’ झाल्यावर चमूनं मग नव्या दमानं एकनाथाला वळसा घालून श्रेयनगराकडं प्रस्थान केलं. रंगपंचमीलाही ‘निर्लेप’पण राखून ग्रामपंचायत करानं त्रस्त झालेल्या रामाला टीमनं रंगात माखून टाकलं अन् कचरा होळीच्या शुभेच्छा दिल्या. हातातील ‘उद्योगवाढीच्या १०० टिप्स’ हे पुस्तक बाजूला ठेवत त्यांनी, अर्थव्यवस्था सुधारते तसा कचरा वाढत जातो, कचरा वाढीचं हे कारण सांगताच पोरांनी तिथून धूम ठोकली. पुढं रसाळ वाणीत, ‘होळीच्या समकालीन संदर्भा’वर टीकात्मक व्याख्यान सुरू होतं. टवाळखोरांना तेथे ‘सुधीर’ धरणं अवघडच.‘होळी रे होळी, पुरणाची पोळी’ अशी बोंब मारत ही टोळी उल्कानगरीत मनपाच्या माजी आयुक्तांच्या घरी रंग खेळण्यास गेली. शहराचं सौंदर्य खुलविण्यासाठीच्या त्यांच्या ‘कृष्णा’लीला तेव्हा तोंडोतोंडी झाल्या होत्या. त्यांना पिचकारीनं भिजवत पोरांनी ‘कचरा’ उधळला. तेव्हा ‘भोगे’लेले क्षण आठवून ते म्हणाले,‘दिस कासावीस होतोरात टाकते उसासेदैवगतीच्या खेळातसारे उलटेच फासे...’पुढं जनसामान्यांचं रंगयुद्ध पेटलेलं होतं. बाजूलाच कचºयाचा ढीग. ताकदवर मंडळी अनेकांना कचºयाच्या ढिगावर लोळवत होती. पूर्वी उघड्या गटारात लोळत अगदी तसेच; पण आता जमाना बदललाय. प्रशासनाचं आवाहन कोरडी होळीचं... सोबतीला कचºयाच्या ढिगाºयांची सोय... इको फे्रंडली होळी आलीया. भान्या पुटपुटला.