कन्नड : तालुक्यातील सर्व कार्यालय प्रमुखांची तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते व तहसीलदार संजय वारकड यांच्या उपस्थितीत मान्सूनपूर्व नियोजन, जागतिक पर्यावरणदिनी वृक्षलागवड व लसीकरणाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तालुक्यातील नदीकाठी असलेल्या ४८ पूरसदृश गावांमध्ये प्राधान्याने उपायोजना व मान्सूनपूर्व नियोजन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून ५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरणदिनी प्रतिव्यक्ती तीन झाडे याप्रमाणे वृक्षलागवड करण्यासाठी नियोजन करण्यात आले. सर्व ग्रामपंचायत व नगरपालिकेतील सर्व प्रभागांमध्ये घन वृक्षलागवड, गाव तेथे देवराई, रस्ता दुतर्फा वृक्षलागवड, सार्वजनिक विहिरीच्या शेजारी वृक्षलागवड, स्मृतिवन, नदी व नाल्यांच्या काठांवर बांबू लागवड अशा प्रकारचे कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. तालुक्यात प्राप्त होणाऱ्या लसींचे योग्य नियोजन करून कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लसीकरण होईल यासाठी प्रयत्न करावे. गावागावांमध्ये तपासण्या करून कोरोना कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले.
बैठकीस पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सुनील नेवसे, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, प्रभारी मुख्याधिकारी शेख हारुण, उपविभागीय अभियंता सोनकांबळे, भावठानकर, डाफने, वनपरिक्षेत्र अधिकारी गायके, पेहरकर, लागवड अधिकारी बाणखेले, साहाय्यक निबंधक अर्चना वाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत गावंडे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
चौकट
बैठकीत देण्यात आलेल्या सूचना
तालुक्यातील विविध रस्त्यांवरील पुलांची दुरुस्ती, तलावांची संबंधित विभागाने तत्काळ पाहणी करावी, गावागावांमधील पोहणाऱ्या व्यक्तींच्या याद्या तयार कराव्यात, मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्ती करावी, ग्रामपंचायत व नगर परिषदेने पावसाच्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी गावातील नाल्यांची साफसफाई करावी, विविध धरणांचा, पाझर तलावांचा संरक्षण आराखडा तयार करावा, वीज वितरण कंपनीने वीजतारांजवळील वृक्षांची छाटणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
फोटो : कन्नड येथे मान्सूनपूर्व नियोजन बैठकीस उपस्थित अधिकारी, कर्मचारी.
190521\img-20210519-wa0108_1.jpg
कन्नड येथे मान्सूनपूर्व नियेाजन बैठकीस उपस्थित अधिकारी कर्मचारी.