औरंगाबाद : नवीन गाडी घ्यायची असेल तर यापुढे केवळ एखादा रहिवासी पुरावा देऊन चालणार नाही. कारण आरटीओ कार्यालयात वाहनाची नोंदणी करताना रहिवासी पत्त्याची खात्री करण्यासाठी यापुढे एकापेक्षा जास्त पुराव्यांची मागणी केली जाणार आहे. त्यामुळे आता नवीन वाहन घेण्यासाठी जाताना एकापेक्षा जास्त रहिवासी पुरावा घेऊनच जावे लागणार आहे.परिवहनेतर आणि परिवहन विभागामध्ये नव्या वाहनांची नोंदणी करताना परिवहन आयुक्तांच्या सूचनेवरून हा आदेश जारी करण्यात आला आहे. शोरुममध्ये नवीन गाडी घेताना एखादा रहिवासी पुरावा जोडला जातो, अशा एका पत्त्यावरून वाहनाची नोंद झाल्यानंतर अनेकदा आरसी बुक पाठविल्यावर पत्ता सापडत नाही. त्यामुळे आरसी बुक आरटीओ कार्यालयात परत येण्याचे प्रकार वाढत आहे. किरायाच्या घरात राहणाऱ्यांच्या संदर्भात हा त्रास अधिक होतो. हा प्रकार टाळण्यासाठी यापुढे अतिरिक्त पुरावा घेण्यावर भर दिला जाणार आहे. यासंदर्भात वाहन वितरकांना माहिती दिली जात आहे. रहिवासी पत्त्याची सतत्या पडताळणी करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सांगितले.
नवीन गाडी घ्यायची, मग जास्त पुरावे द्या
By admin | Published: July 20, 2016 12:03 AM