औरंगाबाद : मराठवाड्यात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मंगळवारी सर्व यंत्रणांना दिले. मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, जि. प. सीईओंना त्यांनी याबाबत सूचना दिल्या आहेत, तसेच विभागात अद्याप लॉकडाऊनबाबत निर्णय झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र असण्याची शक्यता आहे. नागरिक मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात धुणे विसरू नये, यासाठी जनजागृती तर करावीच, शिवाय बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही विभागीय प्रशासनाने सूचित केले आहे. मराठवाड्यात औरंगाबाद, नांदेड, परभणी, बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळण्याबाबत नागरिकांना जागृत करणे आवश्यक आहे. नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागृत करणे हा कारवाईमागचा उद्देश असल्याचे प्रशासनाने विभागातील सर्वांना सुचविले आहे. पोलीस अधीक्षकांशी आयुक्तांनी संपर्क करून सूचना दिल्या, तर मनपा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनादेखील त्यांनी, नागरिकांनी मास्क वापरण्याबाबत मोहीम राबविण्याबाबत सांगितले.
पंचतारांकित हॉटेल्सची बैठक घ्यापंचतारांकित हॉटेल्सना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सूट देण्यात आली आहे आणि सामान्य मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सर्व पंचतारांकित हॉटेल्स व्यवस्थापकांची बैठक घेऊन त्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले नियम सांगण्यात यावेत, अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.