जालना : महाराष्ट्र दिनी राज्यातील सर्वच ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होणार आहेत. या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतीमालाला हमी भाव मिळावा, याबाबत ठराव घ्यावा, असे आवाहन कॉँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जेथलिया यांनी म्हटले आहे की, शेतकरी कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे व शेती मालाला उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळेल इतका हमीभाव देण्याची मागणी सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी सनदशीर प्रयत्न म्हणून विधानसभेतील विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या ग्रामसभेत हा ठराव मंजूर करण्याचे आवाहन केल्याचे जेथलिया यांनी म्हटले आहे. हजारो ग्रामपंचायतींना ई-मेल पाठवण्यात आले आहेत. टपालाव्दारेही कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. शेतकरी कर्जमाफी व हमीभावाची लढाई निर्णायक टप्प्यावर आली असल्याचे नमूद करुन जगाचा पोशिंदा बळीराजाच्या हक्कासाठी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जालना जिल्हा कॉँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्ह्यातील अधिकारी ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करुन मांडण्याच्या अनुषंगाने सर्व कॉँग्रेस तालुकाध्यक्ष, पदाधिकारी, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी याबाबत बैठक घेऊन बाबत रणनिती आखली असल्याची माहिती जेथलिया यांनी पत्रकात दिली आहे. शेतकरी कर्जमाफी व हमीभाव या मागणीसाठी काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी राज्य विधीमंडळात अक्रमक भूमिका घेतली असून प्रारंभी अक्रमक भूमिका व त्यांनतर काढण्यात आलेल्या राज्यव्यापी संघर्ष यात्रेमुळे सरकार प्रचंड दबावाखाली आले असल्याचे नमूद करुन जेथलिया यांनी म्हटले आहे.
कर्जमाफी,हमी भावाचा ठराव घ्यावा
By admin | Published: April 30, 2017 12:21 AM