औरंगाबाद : समृद्धी महामार्गासह इतर जे मार्ग बांधणीचे काम यापुढे जेव्हा सुरू होईल, तेव्हा त्यालगत शेतजमिनीतून माती आणि मुरूम उपसा करून तेथे कंत्राटदार शेततळे बांधून देणार आहे. शेतकऱ्यांनी होकार दिला तरच करार करून महामार्गांसाठी शेतातील माती, मुरूम उपसून तेथे शेततळे बांधून देता येईल.
याबाबत मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, राज्य रस्ते विकास महामंडळाची संयुक्त बैठक झाली. बैठकीला रस्ते विकास महामंडळ कंत्राटदार प्रतिनिधी, तलाठी, कृषी विभागाचे अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांची उपस्थिती होती.जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले की, शासकीय गायरान आणि खदानीतून महामार्गासाठी गौणखनिज मिळणार नाही. त्यासाठी जेथून महामार्ग जाणार आहे, त्यालगतच्या शेतजमिनीत विशिष्ट आकारामध्ये शेततळे कंत्राटदार खोदून देईल. ते शेततळे किती खोल खोदावे याबाबत शेतकरी आणि कंत्राटदार यांच्या समन्वयाने निर्णय घेतला जाईल. त्यासाठी एक अर्ज करावा लागेल, त्या अर्जावर कृषी सहायक, कंत्राटदार आणि शेतकरी यांच्यात त्रिसदस्यीय करारनामा होईल. त्या करारानुसार शेतामध्ये कंत्राटदार खोदून माती, मुरूम व गौणखनिज घेऊन त्याचा वापर समृद्धी महामार्गासाठी करील. शेततळ्यासाठी सरकारी अनुदान मिळणार नाही. प्लास्टिक अंथरण्यासाठी अनुदान देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. नोव्हेंबर महिन्यांत या निर्णयाचा अध्यादेश शासनाने जारी केला आहे.जिल्ह्यातून जाणार समृद्धी महामार्गजिल्ह्यातील गंगापूर, वैजापूर आणि औरंगाबाद तालुक्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. १३६ गावांतून जाणाºया या मार्गासाठी १६०० हेक्टरपैकी ८० टक्के भूसंपादन झाले आहे. या मार्गाचे लवकरच भूमिपूजन होणार असून, मुंबई आणि नागपूर येथे व ज्या जिल्ह्यांतून मार्ग जाणार आहे, तेथील पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. डिसेंबर किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.