छत्रपती संभाजीनगर : कामे करायचीच नसतील, तर तुम्ही सरळ स्वेच्छानिवृत्ती घेऊन नोकरी सोडू शकता. उगीच वेळ घालवून ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळू नका, या शब्दांत मुख्य कार्यकारी विकास मीना यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांच्या ठिकाणी गैरहजर आढळून आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची गुरुवारी चांगलीच खरडपट्टी काढली.
वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतरही काही सरपंचांच्या याच तक्रारी होत्या. त्यामुळे तथ्यशोधनासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी पथके स्थापन करून त्यामार्फत अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांंना भेटी देऊन रात्रीच्यावेळी पाहणी केली. त्यानंतर स्वत: विकास मीना यांनी काही अधिकाऱ्यांसोबत आरोग्य केंद्रांना भेट दिली. तेव्हा अनेक वैद्यकीय अधिकारी- कर्मचारी गैरहजर आढळून आले.
त्यासंदर्भात गुरुवारी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सरपंच, ग्रामसेवकांची संयुक्त बैठक घेतली.बैठकीत प्रामुख्याने वरुडकाझी, लाडसावंगी, देवगाव रंगारी, लाडगाव, सिद्धनाथ वडगाव, बिडकीन, निलजगाव, जिकठाण, वाळूज, आदींसह १८ आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, ग्रामसेवकांची झाडाझडती घेतली. या बैठकीत आरोग्य केंद्रातील औषधांची उपलब्धता, सोयीसुविधा, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गरोदर मातांची नोंदणी, तपासणी, संस्थेतील प्रसूती, बालकांचे लसीकरण, बाह्यरुग्ण तपासणी, आंतररुग्ण नोंदणी, पोस्टमार्टम, बायोमेट्रिक हजेरी, जन्म-मृत्यू नोंदणी, क्षयरुणांचे उपचार, असंसर्गिक आजारांची तपासणी व उपचारासाठी आलेल्या रुग्णांची माहिती, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्र भेटीचा आढावाही घेण्यात आला.
ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळू नकाग्रामसेवक व वैद्यकीय अधिकाऱ्यांना तुम्ही एकमेकांना ओळखता का, तुमचा एकमेकाशी संवाद होतो का, असा प्रश्न करून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची उलट तपासणी सुरू केली. मुख्यालयी राहिल्यास गावातील लोकांचा तुम्हाला त्रास आहे का, कोणाला काही अडचण असेल तर ते आताच सांगा, कामेच करायची नसतील, तर खुशाल ‘व्हीआरएस’ घेऊन नोकरी सोडू शकता. उगीच ग्रामीण जनतेच्या आरोग्याशी खेळू नका. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पहिल्यांदाच संतप्त रूप पाहून उपस्थित सर्वांच्याच पायाखालची जमीनच सरकली.