औरंगाबाद कॉंग्रेसची गाऱ्हाणी
औरंगाबाद : जिल्ह्याचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी मंगळवारी मुंबई मंत्रालयात तब्बल दोन-अडीच तास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसची गाऱ्हाणी ऐकली. जिल्ह्याला पुरेसा विकास निधी मिळावा, शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांची वर्णी लागावी हा आग्रह यावेळी धरण्यात आला.
शासकीय समित्यांसाठी अद्याप शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसची यादी तयार नाही. कॉंग्रेसची तयार आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा करून या शासकीय समित्या लवकर कशा जाहीर होतील, यात लक्ष घालण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले. बैठकीत पक्षांतर्गत विषयांबरोबरच जिल्ह्यातील विविध विकासकामांचीही चर्चा करण्यात आली.
राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख हे औरंगाबाद जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे संपर्कमंत्री आहेत. त्यांनी नुकताच औरंगाबाद दौरा करून बैठक घेतली होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे जिल्ह्यातील विविध विषय घेऊन काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी मंगळवारी मुंबईत गेले होते. त्यांच्यासमवेत त्यांनी विषयनिहाय चर्चा केली. जिल्ह्यातील पक्षवाढीबरोबरच विविध विकासकामांच्या बाबतीतही सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आगामी निवडणुकांची पक्षपातळीवर तयारी करावी, बूथ कमिट्या मजबूत कराव्यात, पक्षांतर्गत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या कराव्यात, यात सक्रिय कार्यकर्त्यांना संधी द्यावी, तरुण कार्यकर्त्यांना पक्षकार्यात सहभागी करून घ्यावे, शासनाच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी, अशा सूचनाही यावेळी देशमुख यांनी केल्या.
जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेऊन त्यासंदर्भातील अडचणीही त्यांनी समजून घेतल्या. त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाकडे तसेच मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, आ. राजेश राठोड, अनु.जाती विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. जितेंद्र देहाडे, किरण पाटील डोणगावकर, भाऊसाहेब जगताप, अनिल सोनवणे, विनोद तांबे, भास्कर घायवट, अनिल श्रीखंडे, नगराध्यक्ष कमर भाई, संदीप बोरसे, आतिष पितळे, गौरव जैस्वाल, जयप्रकाश नारनवरे, कैसर आझाद यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.