ग्राम परिवर्तन अभियान : सुंदर माझे कार्यालय, सुंदर माझे गाव उपक्रम
---
औरंगाबाद : ग्राम परिवर्तन अभियानाअंतर्गत सुंदर माझे कार्यालय आणि सुंदर माझे गाव अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी औरंगाबाद तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांची कार्यशाळा पंचायत समितीत पार पडली. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांनी यावेळी ग्रामसेवकांना मार्गदर्शन केले.
लोकसहभागातून गाव स्वच्छ करणे, कार्यालयाची अंतर्बाह्य स्वच्छता, शौचालय, वॉश बेसिन स्वच्छता, कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र देणे, शासकीय इमारतीना रंगरंगोटी करणे, गावातील भिंतीवर गणिताची सूत्रे, जनरल नॉलेज, सुविचार लिहून भिंती बोलक्या करणे, शंभर टक्के करवसुली, दिव्यांग निधी पूर्ण खर्च करणे, अभिलेख वर्गीकरण करणे व गठ्ठे बांधून ठेवणे, लेखा आक्षेप निकाली काढणे, डेन्स फॉरेस्ट लागवड पूर्वतयारी आदी कामांचा भोकरे यांनी ग्रामपंचायत निहाय आढावा घेतला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश दाभाडे, सहायक गटविकास अधिकारी अंबादास गायके, विस्तार अधिकारी एस. पी. साळुंके, डी. एन. मगर, आर. एल. राठोड, डी. एल. बागुल यांच्यासह अधिकारी ग्रामसेवक उपस्थित होते.