शिक्षण : बोलक्या भिती, सुंदर बागेने केली शाळा सुंदर
औरंगाबाद : अडगाव बु. केंद्रातील टाकळी शिंपी प्राथमिक शाळेचा लोकसहभागातून कायापालट झाला आहे. येथील ग्रामस्थांसह, शाळा व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नांतून चिमुकल्यांना शाळेची ओढ लावली. २० ते २५ पटसंख्येच्या शाळेतून आज ४० विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.
गावातील शिक्षणप्रेमी युवक, ग्रामस्थांनी शाळेच्या विकासाला स्वयंपाकगृहापासून सुरुवात केली. लोकसहभागातून गॅस कनेक्शन घेतले. शाळेच्या प्रांगणात सुंदर बाग फुलवली. येथील मुख्याध्यापक जयश्री बनकर यांच्यासह शिक्षकांनी स्वखर्चातून परिसराची स्वच्छता करून घेतली. शाळेच्या भिंतींची रंगरंगोटी करून भिंती बोलक्या केल्या. व्यवस्थापन समितीने एक सदस्य एक झाड ही संकल्पना राबवून परिसर हिरवागार केला. लाॅकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना गावातील मुलांनी ऑनलाइन अभ्यासात गुंतवून ठेवण्यात मदत केली. प्रदीप शिंदे, गणेश खडके, सुदाम नाबदे, सिद्धार्थ वाणी यांनी त्यासाठी मदत केली. तर समितीचे अध्यक्ष गोरख खडके, उपाध्यक्ष मुरलीधर वाणी यांची यासाठी मदत मिळाल्याचे बनकर यांनी सांगितले. आज सुंदर माझी शाळा म्हणून गावकऱ्यांकडूनही काैतुक होत आहे.