बीड: तालुक्यातील अंथरवण पिंप्री येथे अवैध धंदे बोकाळले असून ती बंद करावीत या मागणीसाठी ग्रामस्थ जिल्हा पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या भेटीसाठी शनिवारी सकाळी दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक अभय डोंगरे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. बीड तालुक्यातील अंथरवन पिंप्री येथे देशी-विदेशी दारुची सर्रास विक्री केली जात आहे. तळीरामांमुळे तांड्यावरील लोकांना दैनंदिन जीवनात मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. दारुडे महिलांना त्रास देतात, मारहाण करत आहेत. यामुळे अनेकांना तांड्यावर राहाणे मुश्किल झाले आहे. काही व्यक्तींच्या देखरेखीखाली पत्त्याचा क्लब चालू करण्यात आला आहे. तरुण मुले पत्ते खेळत बसत असल्याने कर्जबाजारी होत चालले असून त्यांचे भविष्य अंधारत जात आहे. विशेष म्हणजे, पत्ते खेळण्यासाठी काही ग्रामस्थ स्वत:ची जमीन गहाण ठेवत असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी सांगितला. ही अधोगती केवळ पत्त्याचा क्लब चालत असल्याने होत असल्याने क्लब चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात अनेक वेळा निवेदने देऊनही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तांड्यावर सर्रास दारुची विक्री केली जात आहे. निवेदन देऊनही कारवाई झाली नसली तरी अद्याप त्यांनी अपेक्षा सोडली नाही. त्यांनी पुन्हा जिल्हा अधीक्षक कार्यालयात जाऊन अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे. विठ्ठल राठोड, रघुनाथ राठोड, भानुदास पवार, रमेश पवार, प्रल्हाद राठोड, भानुदास राठोड, झालाबाई पवार, पत्याचा क्लब चालविणारा रघुनाथ राठोड यांच्यावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनावर रमाबाई राठोड, आसराबाई राठोड, आशाबाई राठोड, सिताबाई राठोड, जनाबाई राठोड, केसरबाई राठोड, लताबाई राठोड, आशाबाई राठोड, रमाबाई राठोड, छमळाबाई राठोड, केसराबाई जाधव, मुक्ताबाई राठोड, गोदावरी राठोड, अनीता राठोड, जनाबाई पवार, कमलबाई राठोड, निलाबाई राठोड, अनिता राठोड आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)
तांड्यावरील महिलांना तळीरामांचा त्रास
By admin | Published: September 20, 2014 11:25 PM