छत्रपती संभाजीनगर : राज्यात तलाठी भरती करण्यासाठी टीसीएस कंपनी राज्यभरात परीक्षा घेत आहे. परीक्षेचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे सकाळी ९ वाजता सुरू होणारा पेपर ११ वाजता सुरू झाला. त्यामुळे तीन शिफ्टमधील परीक्षा विस्कळीत झाल्या. परीक्षेसाठी १ हजार रुपये शुल्क भरल्यानंतरही शहरातील चिकलठाणा एमआयडीसीतील आयवॉन डिजिटल झोन परीक्षा केंद्रात युवकांकडून बॅग ठेवण्यासाठी २० रुपये चार्ज आकारण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राज्यात तलाठी पदाच्या ४ हजार ६४४ जागांसाठी १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे. दररोज तीन शिफ्टमध्ये परीक्षा होत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात टीसीएस कंपनीचे आयऑन डिजिटल हे अधिकृत परीक्षा केंद्र आहे. त्याशिवाय सेव्हन हिल येथे बायटेझ इन्फोटेक, शहानुरमिया दर्गाह येथे युआन डिजिटल, पीईएस अभियांत्रिकी, आयसीएम इंजिनिअरिंगसह इतर ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत. या सर्वच परीक्षा केंद्रांवर सकाळी ९ वाजताच पहिल्या सत्रातील परीक्षेचे आयोजन केले होते. एकूण १०० प्रश्नांचा हा पेपर देण्यासाठी सकाळी ८ वाजताच परीक्षार्थी केंद्रांवर दाखल झाले होते. सकाळी ८ वाजता केंद्रात गेलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा प्रत्यक्षात ११ वाजता सुरू झाली. तेथून पुढे १ वाजेपर्यंत पहिल्या सत्रातील पेपर चालला. त्यानंतर पुढील दोन्ही सत्रातील परीक्षा पुढे ढकलण्यात आली. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह त्यांच्या नातेवाइकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे मुख्य परीक्षा केंद्र असलेल्या चिकलठाण्यातील आयऑन परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांना बाहेर बॅग ठेवण्यासाठी २० रुपये चार्ज आकारण्यात येत आहे. त्याशिवाय आतमध्ये केंद्रात विद्यार्थ्यांना स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नसल्याची धक्कादायक माहिती लोकमतशी बोलताना परीक्षार्थींनी दिली.
बाहेरुन आलेले ताटकळलेटीसीएस कंपनीच्या गोंधळामुळे छत्रपती संभाजीनगरच्या युवकांना नागपूर, अमरावती येथील केंद्र तर पुण्याच्या युवकांना छत्रपती संभाजीनगर येथील केंद्र देण्यात आलेले आहे. त्यामुळे परीक्षेसाठी एक दिवस अगोदरच विद्यार्थी नातेवाइकांना घेऊन आलेले आहेत. या सर्वांना प्रचंड मनस्ताप परीक्षेच्या गोंधळामुळे सहन करावा लागला. विविध परीक्षा केंद्रांमध्ये पाच तास साधे पिण्याचे पाणीही उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे परीक्षार्थींसह पालकांनी प्रचंड संताप व्यक्त केला.