- शांतीलाल गायकवाड औरंगाबाद : निवडणुका किती महाग झाल्या आहेत, याची चर्चा सध्या जागोजागी रंगते आहे. उमेदवारांना सध्या प्रचारावर ७० लाख रुपये खर्च करता येतात; परंतु १९८० साली झालेली लोकसभेची सातवी निवडणूक काँग्रेसचे उमेदवार प्रख्यात शायर काझी सलीम यांनी फक्त एक लाख रुपये खर्चात जिंकली होती यावर कुणाचा विश्वास बसणार नाही.
काँग्रेसला आणीबाणीचा फटका बसल्याने १९७७ मध्ये देशात मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली पहिले गैरकाँग्रेसी सरकार स्थापन झाले; परंतु देशातील पहिल्या युती सरकारचा प्रयोग पूर्ण फसला. सत्ताधारी जनता दलातील नेत्यांची वाढलेली राजकीय इच्छा व विरोधी तत्त्वांचा संघर्ष होऊन अवघ्या दोन वर्षांत मोरारजी देसाई यांचे सरकार पडले. लोकदलाचे चरणसिंग ६४ खासदारांना सोबत घेऊन या सरकारातून बाहेर पडले. काँग्रेसच्या इंदिरा गांधी यांनी चरणसिंगांना बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली; परंतु संसदेत बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच केवळ दोनच दिवसांत इंदिरा गांधी यांनी पाठिंबा काढून घेतला व संसदेला सामोरे न जाताच चरणसिंग सरकारही कोसळले. त्यामुळे राष्ट्रपतींनी मध्यावधी निवडणुका जाहीर केल्या. जानेवारी १९८० मध्ये ही निवडणूक झाली.
औरंगाबादेतून काँग्रेसने काझी सलीम यांना उमेदवारी दिली. काँग्रेस (यु)ने साहेबराव पाटील डोणगावकरांना तिकीट दिले. या निवडणुकीत ११ उमेदवार उभे होते. ६ जानेवारी रोजी झालेल्या मतदानात ३ लाख ४६ हजार ३३५ मतदारांनी सहभाग घेतला. काझी सलीम यांना १ लाख ६९ हजार ७२३ एवढे विक्रमी मतदान झाले. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी डोणगावकर यांना ८५ हजार ९७५ मते मिळाली. इतर नऊ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. त्यात टी. एस. पाटील (मते ५३ हजार २८१- जनता दल), एस. टी. प्रधान (११ हजार ५५७- रिपब्लिकन पार्टी), किसन श्रीपत (५१४१), दिलावर खान अब्बास खान (१८६०), कचरू बाजीराव (१४८६), पंडितराव शिंदे (१३६५), शेख कासीम किस्मतवाला (१२५२), रावसाहेब हरिभाऊ नरवडे (११२६), रावसाहेब पगारे (६१९, सर्व अपक्ष) यांचा समावेश होता.
सातव्या लोकसभेत ९.३ टक्के मुस्लिम खासदारऔरंगाबाद मतदारसंघातून काझी सलीम सातव्या लोकसभेचे सदस्य झाले. या निवडणुकीत विविध पक्षांमार्फत देशभरातून लोकसभेत ५० हून अधिक म्हणजे एकूण खासदाराच्या ९.३ टक्के मुस्लिम खासदार पोहोचले होते. मुस्लिम समाजाच्या खासदारांची ही आतापर्यंची संसदेतील सर्वात मोठी उपस्थिती व भागीदारी ठरली आहे. महाराष्ट्रातून तेव्हा औरंगाबादेतून काझी सलीम व वाशिममधून गुलाम नबी आझाद हे खासदार झाले, तर मोहम्मद अब्दुल रज्जाक नूर मोहम्मद (अकोला) व काझी उमर (रत्नागिरी) यांचा थोडक्यात पराभव झाला होता.
सहाव्या लोकसभेत मराठवाड्यासह महाराष्ट्राने काँग्रेसला जोरदार फटका दिला होता. १९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसला राज्यात केवळ २०, तर मराठवाड्यात फक्त एक जागा मिळाली होती. १९८० मध्ये हे चित्र बदलून काँग्रेसला राज्यात ४१ व मराठवाड्यातील सर्व ८ जागा मिळाल्या. देशपातळीवर काँग्रेस आघाडीने ३७४ जागा पटकावून देशाच्या पंतप्रधान म्हणून चौथ्यांदा इंदिरा गांधी विराजमान झाल्या.
काझी सलीम यांचा अल्पपरिचयविद्यार्थी दशेपासूनच ते शेतकरी कामगार पक्षात सक्रिय काम करीत होते. १९५५ मध्ये या पक्षातर्फे त्यांनी विधानसभेची निवडणूक लढविली व केवळ २ हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. १९६२-८० मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेत दोनदा सदस्य झाले. १९८० मध्ये खासदार म्हणून विजयी झाले. काँग्रेस पक्षाचे सरकार असताना त्यांनी मराठवाडा रेल्वे रुंदीकरणासाठी सभागृहात पक्षावर तोफ डागली व संसदेबाहेर आंदोलनही केले. त्यामुळे त्यांना ब्लॅकलिस्टेड करून पक्षाने नोटीसही बजावली होती. मराठवाडा विकास आंदोलनातही ते अग्रभागी होते. औरंगाबादेत उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वेरूळ विकास योजनेचे अध्यक्ष असताना वेरुळात शहाजी राजांचे स्मारक, घृष्णेश्वर मंदिरात येणाऱ्यासाठी धर्मशाळा यासह अनेक योजना त्यांनी सरकारला सुचविल्या; परंतु त्या पूर्णत्वास गेल्या नाहीत. परंपरेशी विद्रोह करणारा संवेदनशील मनाचा हा शायर राजकारणात मात्र पूर्ण रमला नाही. त्यांचे ‘नजात से पहले’ व ‘रुस्तगारी’ हे कवितासंग्रह गाजले. त्यांना राज्य व उर्दू साहित्य अकादमीचा वली दखनी पुरस्कारही मिळाला. ८ मे २००५ ला त्यांचे निधन झाले.