‘चाय पे चर्चा’ अन् ‘मन की बात’ ने पोट भरणार नाही - अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 01:00 AM2019-01-22T01:00:08+5:302019-01-22T01:00:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कन्नड : यावर्षी पाऊस कमी पडला, खरिपाचे उत्पन्न कमी आले तर रबीचा उतारा आला नाही. तालुक्यात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कन्नड : यावर्षी पाऊस कमी पडला, खरिपाचे उत्पन्न कमी आले तर रबीचा उतारा आला नाही. तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला, मात्र काही मिळाले नाही. उलट टँकरही वेळेवर मिळत नाही. ‘चाय पे चर्चा’ आणि ‘मन की बात’ने आमची रोजीरोटी येणार नाही, हे राज्यकर्ते समजून घेत नाहीत आणि म्हणून ही परिवर्तन यात्रा आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कन्नड येथील परिवर्तन यात्रेच्या सभेत केले.
व्यासपीठावर राकाँचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. विक्रम काळे, फौजिया खान, माजी आमदार संजय वाघचौरे, किशोर पाटील आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक आ. सतीश चव्हाण यांनी केले.
छगन भुजबळ यांनी भाजप-सेना सरकारवर टीकेची झोड उठविली. मोदी सरकारने ना कष्टकऱ्यांचे भले केले, ना शेतकºयांचे भले केले, जे विरोधात बोलतात त्यांचे तोंड बंद केले जाते. दडपशाहीचा वापर सुरू आहे. सर्वच बाबतीत हे सरकार फेल झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांना कशी बगल दिली, हे सोदाहरण स्पष्ट केले. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला येणाºया निवडणुकीत परिवर्तन घडवून धडा शिकवा, असे आवाहन केले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत बोलताना खोचक टीका केली.
यावेळी फौजिया खान यांचेही भाषण झाले. कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
भुजबळांनी मांडली आजाराची कैफियत
छगन भुजबळ कन्नडच्या सभेत म्हणाले की, मी जेलमध्ये तीन वेळा आजारी पडलो. शेवटचा आजार तर इतका भयंकर होता की, मी झोपू शकत नव्हतो. डॉक्टर यायचे आणि याची गोळी दे, त्याची गोळी दे, असे करायचे. दवाखान्यात पाठवायला तयारच नाही. शेवटी कपिल पाटील यांनी विधानसभेत प्रश्न मांडला आणि शरद पवारांनी पत्र लिहिले की, भुजबळांना काही झाले तर तुम्ही जबाबदार. तेव्हा मला जे. जे. हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
बजाजनगर येथील सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद
वाळूज महानगर : बजाजनगरातील सभेत धनंजय मुंडे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्यापूर्वी दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गत वर्षभरात अनेक उद्योग बंद होऊन १ कोटी बेरोजगार झाले आहेत. छगन भुजबळ यांनी ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडवित ‘अब कितने दिन बचे है’, असे सांगत शेरो-शायरी करीत जनतेला खिळवून ठेवले होते.हे सरकार गेल्याशिवाय परिवर्तन घडणार नसल्याचे सांगत भाजपाला सत्तेपासून दूर फेकण्याचे आवाहन केले.
कचºयाचा प्रश्न सोडवता आला नाही
वैजापूर : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी मागील पंधरा वर्षांत मतदारसंघात कोणती कामे केली, गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांची सत्ता असतानाही त्यांना औरंगाबाद शहरातील कचºयाचा प्रश्न सोडवता आला नाही. अशा नेत्यांना पुन्हा निवडून देणार का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिवर्तन यात्रेत वैजापूर येथील जाहीर सभेत केला. या सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी यांच्या ‘अच्छे दिन’ची खिल्ली उडविली.अजित पवार यांनी स्थानिक प्रश्नांना हात घालत विमानसेवा, शेकडो रेल्वे असताना अहमदाबाद-मुंबई बुलेटट्रेन कशाला हवी, असा प्रश्न उपस्थित केला. त्याऐवजी येथील नागरिकांना सेवा द्या, कुपोषण निर्मूलनासाठी पैसे खर्च करा, फक्त पुतळ्यांवर खर्च करणारे हे सरकार शेतकरी, कामगारांकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी माजी मंत्री फौजिया खान, आ. सतीश चव्हाण, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, आ.विक्रम काळे, जिल्हा कार्याध्यक्ष अभय पाटील चिकटगावकर, जिल्हाध्यक्षा छाया जंगले, युवा तालुकाध्यक्ष अजय चिकटगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
गंगापूर, औरंगाबाद मतदारसंघात परिवर्तन होणारच -धनंजय मुंडे यांचा विश्वास
गंगापूर : गंगापूरच्या सभेत भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्राच्या हक्काचे एक थेंबही पाणी गुजरातला जाऊ देणार नाही. यासाठी सर्वांनी मिळून या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, गंगापूर विधानसभा व औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात परिवर्तन झाल्याशिवाय राहणारच नाही, हा विश्वास आज या ठिकाणी सुरुवातीला व्यक्त करावासा वाटतो. मुस्लिमांना आरक्षण जाहीर होऊनही ते दिले नाही. फडणवीस सरकार हे हजारो कोटींचा भ्रष्टाचार करणाºया मंत्र्यांना क्लीन चिट देणारे सरकार आहे, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी जयंत पाटील, फौजिया खान, आ. सतीश चव्हाण, विक्रम काळे, संजय वाघचौरे, जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ, छाया जंगले, शिवाजी बनकर, विलास चव्हाण, सुरजित खुंगर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नीळ यांनी केले.