लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पावसाअभावी धोक्यात आलेल्या खरीप पिकांची प्रत्यक्ष स्थिती जाणून घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधा, असे आदेश राज्याचे कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.खरीप पीक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर असलेले केंद्रेकर यांनी मंगळवारी जालना व बदनापूर तालुक्यांतील काही गावांना भेटी दिल्या. सोबत जिल्हा कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, कृषी विकास अधिकारी हरिश्चंद्र झनझन पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे सोनुने यांच्यासह तालुका कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सकाळी बदनापूर तालुक्यातील म्हात्रेवाडी, तडेगाव, ब्रह्मनाथ तांडा येथील कपाशी, तूर, मका, मूग इ. पिकांची केंद्रेकर यांनी शेतात पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पेरणी, खते, कीटकनाशके यासाठी केलेला मोठा खर्च वाया जाण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जालना तालुक्यातील रामनगर, डांबरी, परतूरमधील वाटूर भागांतील पिकांची केंद्रेकर यांनी पाहणी केली. पावसात महिनाभराचा खंड पडल्यामुळे पिकांची स्थिती नाजूक आहे. दुबार पेरणीचे संकट निर्माण झाल्यास पुरेसे बियाणे उपलब्ध आहे का, पीकविमा काढण्याचे काम कशा पद्धतीने सुरू आहे. त्याचबरोबर कृषी औजारे वाटप, शेततळे, ठिबक सिंचन या योजनांचे काम जिल्ह्यात कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. शेती उत्पादन वाढीसाठी राज्य शासन विविध योजना राबवत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात बसून टेबलवर्क न करता थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांची अडवणूक होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा तंबी केंद्रेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिली.
थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:55 AM