मुंबई - सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी रॅपर राज मुंगासे यांचं राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारं रॅप चांगलंच व्हायरल झालं होतं. राज्यातील राजकीय परिस्थिती सांगणारे हे रॅप आपलं दुसरंच रॅप साँग असून यापूर्वीही मी रॅप बनवलं होतं. पण, ते रॅप कधी सोशल मीडियावर टाकलं नाही. हे दुसरंच रॅप सोशल मीडियावर टाकलं आणि ते व्हायरल झालं, असे रॅपर राज मुंगासे यांनी मीडियासोबत बोलताना म्हटले. तसेच, चोर आले ५० खोक्के घेऊन चोर आले.. अशा आशयचा रॅप मी बनवला होता. माझ्या रॅपमध्ये कोणाचाही उल्लेख नव्हता, तरीही माझ्याविरुद्ध एफआयआर झाला. पण, ४-५ महिलांना मिळून एकाला मारलं, त्यांविरुद्ध एफआयआर झाला नाही, असे म्हणत त्याने ठाण्यातील आणि राज्यातील घटनांकडे लक्ष वेधले.
मी अनेक दिवसांपासून लिहतो, सामाजिक आणि राजकीय गोष्टीवर लिहतो. काल्पनिक गोष्टींवर लिहणं थोडं अवघडं असतं. पण, राजकीय आणि सामाजिक घटनांवर लिहायला धाडस लागतं, असे रॅपर राज यांनी म्हटले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य उरलंय की नाही हाच प्रश्न आहे. कारण, लोकशाहीने लोकांना बोलण्याची मुभा दिली, पण हा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, तो बंद व्हायला हवा, आम्ही जे बोलतो ते आमच्या रॅपमधून बोलतो, असे राज याने म्हटले.
राजच्या या रॅपमध्ये त्याने '50 खोके घेऊन चोर आले, गुवाहाटी' अशा शब्दांचा वापर केला होता. त्याचे हे रॅप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना(उबाठा) नेते अंबादास दानवे यांनी शेअर केल्यानंतर राज्यभर तुफान व्हायरल झाले. मात्र, यानंतर त्याच्याविरोधात अंबरनाथमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यापासून राज गायब झाला होता. तो नेमका कुठंय, याची माहिती कोणलाही नव्हती. अखेर त्याला अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर तो माध्यमांसमोर आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याच गाडीत बसून तो मुंबईहून छत्रपती संभाजीनगरला पोहोचला. दरम्यान, अंबादास दानवे यांची माझी खूप मदत केली, त्यांच्या वकिलांनीच माझा जामीन मंजूर केल्याचे राजने माध्यमांशी बोलताना साांगितले.