चिंचोली लिंबाजी : घाटशेंद्रा-तळनेर रस्त्याचे काम एका शेतकऱ्याने अडवल्याने एक वर्षापासून या चार किमी रस्त्याचे काम रखडले आहे. प्रशासनासह लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने दुर्गम भागात असलेल्या तळनेरवासीयांच्या नशिबी यंदाही पक्क्या रस्त्याचा वनवास कायम राहणार आहे.
करंजखेड-घाटशेंद्रा-टाकळी अंतूर या मुख्य रस्त्यापासून ४ किमी अंतरावर डोंगररांगांनी वेढलेल्या निसर्गरम्य परिसरात तळनेर गाव वसलेले आहे.
या गावाला जोडणारा घाटशेंद्रा-तळनेर हा कच्चा रस्ता कळीचा मुद्दा बनला आहे. या चार किमी रस्त्यावरून प्रवास करताना ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून गावकरी फक्त पक्क्या रस्त्याची वाट पाहत आहे. प्रथमच या गावाला मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पक्का रस्ता मंजूर झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूने साडेतीन किमी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. मात्र मध्येच एका शेतकऱ्याने काम अडवल्याने एक वर्षापासून ५०० मीटर रस्त्याचे काम रखडले आहे. काम पूर्ण व्हावे, यासाठी ग्रामस्थ, प्रशासन व लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवत आहे. मात्र याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. याकडे लक्ष देऊन तातडीने रखडलेले काम पूर्ण करून घेणार असल्याचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी स्पष्ट केले.
--------
या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी अनेक दिवसांपासून आम्ही प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहोत. आमदारांसह अधिकाऱ्यांकडे याबाबत कैफियत मांडली. मात्र सर्वांनीच याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आम्ही दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे तळनेरचे सरपंच प्रताप गुजर यांनी सांगितले.
--- कॅप्शन : घाटशेंद्रा-तळनेर या रखडलेल्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था आहे.
140621\img-20210609-wa0103.jpg
घाटशेंद्रा-तळणेर (ता.कन्नड )या रखडलेल्या रस्त्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे.