लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात औरंगाबाद तालुका काँग्रेसने काढलेल्या जनआक्रोश मोर्चास आज चांगला प्रतिसाद मिळाला. या मोर्चात चार-पाच बैलगाड्यांच्या माध्यमातून ग्रामीण जनजीवनाचे प्रतिबिंब उमटवण्यात आले होते. कपाशीची झाडे कशी वाळताहेत, डाळिंबाची झाडे वाळून चालली आहेत, दुधाला योग्य भाव मिळत नाही म्हणून कॅन, असे जिवंत चित्र उभे करण्यात मोर्चाचे संयोजक यशस्वी झालेले दिसले.दुपारी एकच्या सुमारास क्रांतीचौकातून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या डोक्यावर तिरंगी टोपी होती. एवढेच नाही तर बैलांची शिंगेसुद्धा तिरंगीच रंगविण्यात आली होती. बैलगाड्यांवर मागण्यांचे फलक लावण्यात आले होते. ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मोर्चाच्या अग्रभागी ग्रामीण भागातून आलेले हलगीवादक हलगी वाजवत होते.मोर्चात महिलांचा सहभागही लक्षणीय राहिला. ग्रामीण भागातून कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. त्यांच्यात उत्साह जाणवत होता. घोषणांचा चोहोबाजूंनी पाऊस पडत होता. त्यातून मोदी सरकारविरुद्धचा आक्रोश बाहेर पडत होता.जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, कार्याध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे, आमदार सुभाष झांबड, शहराध्यक्ष नामदेवराव पवार, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, शहराध्यक्षा सरोज मसलगे पाटील आदींच्या नेतृत्वात निघालेला हा मोर्चा पैठणगेट, टिळकपथ, गुलमंडी, मछली खडक, सिटीचौक, सराफा, शहागंजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे जाहीर सभेत मोर्चाचे विसर्जन झाले. त्यात वक्त्यांची भाषणे टोकदार झाली आणि सभा संपेपर्यंत कुणीही उठून गेले नाही.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेतील भाषणे रंगत गेली. अनेकांनी सरकारविरुद्ध जोरदार आघाडी उघडून बोचरी टीका केली. हे सरकार कसे मुळावर उठले आहे. अच्छे दिनच्या नावावर देशाची फसवणूक करीत आहे, असा टीकेचा सूर होता. सभेत औरंगाबाद तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामूकाका शेळके यांनी प्रास्ताविक केले. राहुल सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. पवन डोंगरे यांनी आभार मानले. नंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. औरंगाबाद तालुका दुष्काळी जाहीर करण्याचा आग्रह यावेळी धरण्यात आला. कापसाला सात हजार रु. हमीभाव मिळावा व दुधाला तीस रु. लिटर भाव द्या, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.
तालुका काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:37 AM