औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्या असून, त्यांच्या तपासणीसाठी तामिळनाडू येथील सेवानिवृत्त अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी येणार आहे. त्या पथकासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात सध्या तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे.
शहरात रोज १३५ एमएलडी पाणी येऊनही प्रशासनाकडून नियोजन केले जात नाही, असा आरोप होतो आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत विद्यमान योजना चालवावी लागणार आहे. ती योजना तपासून आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी तामिळनाडूमधील सेवानिवृत्त अभियंत्यांच्या तज्ज्ञांचे पथक बोलावले आहे. पूर्वी शहरात ९७० कि.मी.ची पाईपलाईन होती. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या काळात शहरात १०० किमीची पाईपलाईन टाकण्यात आली. १०७० किमीच्या पाईपलाईनवर असलेल्या नळांना सध्या पाणी द्यावे लागले आहे. तसेच हजारो नळ कनेक्शन वाढले आहेत. वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा पाणीपुवठा विभागाने केला.
दहा एमएलडी पाणी कमी यावर्षी हर्सूल तलावात पाणीसाठा झाला नाही. हर्सूल तलावातील पाच एमएलडी पाणी काही वॉर्डांना दिले जात होते. हे पाच एमएलडी पाणी कमी झाले, तसेच जायकवाडी धरणातून ५ एमएलडी पाण्याचा उपसा कमी होत आहे. दहा एमएलडी पाणी कमी झाल्याने ताण वाढला आहे. ज्या वसाहतींना हर्सूल तलावाचे पाणी मिळत होते, त्या वसाहतींना शहर पाणीपुरवठा योजनेतून पाणी द्यावे लागत आहे. जायकवाडीतून १५९ एमएलडी पाणी मनपा उपसते, असे जायकवाडी प्रकल्प उपसा योजनेकडे रेकॉर्ड आहे. पंपिंग स्टेशनवरील मीटरदेखील नादुरुस्त होते. ते गुरुवारी दुरुस्त करण्यात आले.