राम शिनगारे -
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी तनिषा सागर बोरामणीकर हिने ६०० पैकी ६०० गुण घेत बारावीच्या निकालात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. १०० टक्के घेणारी तनिषा राज्यातील एकमेव असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी दिली.
तनिषाला लेखी परीक्षेत ६०० पैकी ५८२ गुण आणि खेळाचे १८ गुण असे एकूण ६०० गुण मिळाले. तिचे वडील सागर हे आर्किटेक्ट व आई रेणुका सीए आहेत. वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती बुद्धिबळ खेळते. तिने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत १८ पेक्षा अधिक बक्षीसे पटकावली आहेत.
३० डिसेंबरपर्यंत बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. त्यानंतर बारावीच्या परीक्षेचा अभ्यास सुरू केला. अवघ्या दोन महिन्यांच्या अभ्यासात हे यश मिळाले. आता सीएची परीक्षा देणार असून, सीए झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणार आहे. - तनिषा बोरामणीकर, गुणवंत विद्यार्थिनी
‘लोकमत’मुळेच बुद्धिबळाची गोडीलहान असतानाच मामेभावामुळे बुद्धिबळ खेळू लागले. सीनिअर केजीमध्ये असताना पहिल्यांदा ‘लाेकमत टाइम्स कॅम्पस क्लब’च्या बुद्धिबळ स्पर्धेत भाग घेतला. त्या ठिकाणी पारितोषिक मिळाल्यामुळे बुद्धिबळाची गोडी लागली. बुद्धिबळाचा बारावीच्या परीक्षेत मोठा फायदा झाल्याचे तनिषाने सांगितले. तिचे आजोबा अशोक बोरामणीकर म्हणाले, केवळ ‘लोकमत’च्या स्पर्धेत सहभाग घेतल्यामुळेच तिला बुद्धिबळाची प्रेरणा मिळाली.