आडूळ (औरंगाबाद ) : बालानगर शिवारात एका शेतात कोरड्या पडलेल्या विहिरीत पाणी टाकताना खाजगी पाण्याचे टँकर कोसळ्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. सुदैवाने प्रसंगावधान राखून चालकाने बाहेर उडी घेतल्याने अनर्थ टळला.
याबाबत अधिक माहिती अशी की, बालानगर येथील शेतकरी रहेमान करीम कुरेशी यांची गट नंबर २०२ मध्ये शेती असून या शेतात त्यांनी चारशे मोसंबीची झाडे लावलेली आहे. उन्हाळ्यात ही सर्व झाडे जतन करण्यासाठी शेतकरी कुरेशी हे खाजगी टँकरने पाणी आणून स्वत:च्या कोरड्या विहिरीत टाकतात.
दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजेदरम्यान खाजगी टँकर पाणी घेऊन आले. ते पाणी विहिरीत टाकण्यासाठी टँकर मागे घेत असताना अचानक टँकरचे चाक विहिरीच्या कठड्यावरून खाली घसरले. टँकर पाण्याने भरलेले असल्यामुळे जोरात विहिरीत खाली कोसळले. याचवेळी चालक विष्णू दिनकर तानवडे (३८, रा. खादगाव ता. पैठण) यांनी प्रसंगावधान राखून खाली उडी घेतली. यामुळे अनर्थ टळला. मात्र, टँकर ७० फूट खोल कोरड्या विहिरीत कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच तलाठी दिपक मानघरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. जेमतेम राहिलेली मोसंबीची झाडे जगविण्यासाठी परिसरात कुठेही पाणी नाही. तरीही येथील शेतकरी फळबाग जगविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे.