छत्रपती संभाजीनगर : शहरातील २०० पेक्षा अधिक वसाहतींना महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करते. दरवर्षी उन्हाळ्यात मनपाचे टँकर एमआयडीसीच्या पाण्यावर भरण्यात येतात. यंदा मनपाला दररोज ३ एमएलडी पाण्याची गरज असताना एमआयडीसीकडून फक्त १ एमएलडी पाणी मिळत आहे. त्यामुळे एन-५ जलकुंभावरून टँकर भरून द्यावे लागत आहेत. सिडको-हडकोत पाणीटंचाईचे संकट अधिक गडद आहे.
मे-महिना सुरू होण्यापूर्वीच पाण्याची मागणी वाढली आहे. शहरात दररोज १२० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे. हर्सूल तलावाचे ७ एमएलडी पाणी घेतले जात आहे. टँकरद्वारे विविध वसाहतींना पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी एमआयडीसीचे सहकार्य घेतले जाते. एमआयडीसीने टँकरसाठी मनपाला ३ एमएलडी पाणी द्यावे असे आदेश एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत. त्यानुसार चिकलठाणा एमआयडीसीतील एन-१ येथील जलकुंभातून टँकर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एमआयडीसीकडून विविध कारणे सांगून दररोज १ एमएलडी पाणी दिले जात आहे.
या संदर्भात प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून टँकरसाठी नियमित ३ एमएलडी पाण्याची मागणी केली. तसेच विभागीय आयुक्तांनी देखील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना तुमचे नाटक बंद करा, मनपाला सहकार्य करा अशी सूचना केली आहे. तरी देखील एमआयडीसीकडून सहकार्य मिळत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. मनपाला एन-५, एन-७ च्या जलकुंभावरून टँकर भरून द्यावे लागत आहे. दररोज ३५० ते ४०० टँकरच्या फेऱ्या होत असून त्यात दिवसेंदिवस वाढ होण्याची शक्यता आहे. टँकरला पाणी देताना शहरातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पाळता येत नाही, काही भागाला कमी दाबाने तर काही भागाला दुसऱ्या दिवशी पाणी द्यावे लागत असल्याचे सूत्रांनी सांगितले.