सोयगाव (औरंगाबाद ) : सोयगावसह तालुक्यात ठिबक सिंचनवर उन्हाळी पिके आणि भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, अचानक पाण्याचे गंभीर संकट पसरल्याने शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेऊन पिकांना जगवावे लागत आहे. पिण्यासाठी आणि पिकांसाठी पाणी असणाऱ्या विहीरीतून किंवा टॅंकरद्वारे विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
उन्हाच्या झळा वाढल्याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून तालुक्यात पाण्याचे मोठे दुर्भिक्ष पसरले आहे. तसे पाहता मार्च महिन्यातच नागरिकांना पिण्यासाठी विकतचे पाणी घेण्याची वेळ आली होती. आता मे हिटच्या तडाख्यात उन्हाळी पिकांसोबत भाजीपाल्याचे क्षेत्र जगविण्यासाठी आसपासच्या पाणी असलेल्या विहिरीतून पाईपलाईन अथवा टॅंकरद्वारे विकतचे पाणी घेवून विहिरीत सोडावे लागत आहे. यांनतर याचा वापर पिकांना पाणी देण्यासाठी होतो.
एकंदरीत परिसरात उन्हाळी पिकांची व भाजीपाल्याची निगा राखण्यासाठी महिन्याला जवळपास २५ हजाराचे पाणी एका शेतकऱ्याला विकत घ्यावे लागले आहे. या परिसरातील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी पाहता हा आकडा महिन्याला ३० लाखावर जातो. पिण्यासाठी पाण्याची चिंता न करता शेतकरी पिकांच्या पाण्याची चिंता करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. विकत घेतलेले पाणी शेतकरी विहिरीत सोडून पिकांना देतात. त्यामुळे पिकांसाठी पाणीही विकतचे त्यात वीजपंपाचे अवाढव्य बिल यामुळे हा उन्हाळी पिकांचा हंगाम तालुक्यासाठी महागडा ठरला आहे.