लातूर : महापालिकेने नळाला मीटर बसविण्याची निविदा काढून कामाला प्रारंभ झाले तेव्हा विरोध करणाऱ्या नागरिक हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आता विरोध मावळला असून सोमवारी त्यांनी आपल्या स्वत:च्या घरी बाजारातून आणून नवीन मीटर बसवून घेतले आहे़ महापालिकेने गळती बंद करून अनधिकृत नळधारकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही समितीचे अॅड. मनोहरराव गोमारे, अशोक गोविंदपूरकर व अॅड. उदय गवारे या ‘थ्रीजीं’नी केली आहे.यापूर्वी नळाला मीटर बसविण्याचा प्रयत्न मनपाने केला होता. मात्र नागरिक हक्क समिती स्थापन करून अॅड. मनोहरराव गोमारे, अशोक गोविंदपूरकर, अॅड. उदय गवारे यांनी विरोध केला होता. आता या ‘थ्रीजीं’नी यू-टर्न घेत नळाला मीटर बसविण्यास सहमती दर्शविली आहे. मात्र दर आकारणीला विरोध केला आहे.मनपाने यापूर्वी नळाला मीटर बसविण्यासाठी काढलेल्या निविदेतील दर अवाजवी असल्याचे लक्षात आल्याने समितीने याला विरोध करीत आयुक्तांना निवेदन दिले होते़ बाजारात वाजवी दरात मिळणारे मीटर बसविण्याची ग्राहकांना मुभा द्यावी, अशी मागणी केली होती़ सध्या मनपाच्या सर्व परिमानाचे मीटर ९७५ ते ११०० रूपयांपर्यंत मिळत आहेत़ सदरील मीटर हे ग्राहकांना परवडणारे आहेत़ मनपाने २० जानेवारीपर्यंत ग्राहकांनी स्वत:हून मीटर बसवून घेण्याचे आवाहन केले आहे़ त्यानुसार सोमवारी नागरिक हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मीटर बसविण्यास आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर अशोक गोविंदपूरकर यांच्या घरी या थ्रीजींच्या उपस्थितीत नळाला मीटर बसविण्यात आले. निवडणुकीच्या तोंडावर हा यू-टर्न घेतल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)
नळाला मीटर; ‘थ्रीजीं’चा यू-टर्न
By admin | Published: January 02, 2017 11:54 PM