वाळूज महानगर : वाळूज ग्रामपंचायतीने येथील भगतसिंगनगरात नुकतीच पाणीपुरवठ्यासाठी अंतर्गत जलवाहिनी टाकली आहे. मात्र या जलवाहिनीवर वॉल्व्ह बसविण्यात न आल्याने जोडणी केलेल्या नळाला कमी दाबाने पाणी येत आहे. योग्य दाबाने पाणी पुरवठा केला जात नसल्याने हे नळ केवळ शोभेची वस्तू ठरत आहेत. रहिवाशांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
येथील भगतसिंग नगरात पाणीपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतीने नुकतीच मुख्य जलवाहिनी टाकून अंतर्गत पाईपलाईनचे कामही सुरु केले आहे. जवळपास ८ ते १० गल्ल्यांत पाईप अंथरण्याचे कामही पूर्ण झाले असून, काही गल्ल्यांतील काम सुरु आहे. नव्याने टाकलेल्या जलवाहिनीवर रहिवाशांनी नळजोडणी घेतली आहे. परंतू जलवाहिनीवर अद्याप वॉल्व्ह बसविले नाहीत.
या भागाला आठवड्यातून एकदा पाणी सोडले जाते. मात्र, पाणी सोडल्यावरही नागरिकांच्या नळाला योग्य दाबाने पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे अर्ध्या तासात केवळ दोन ते तीन हंडे पाणी नागरिकांना मिळत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत असून लगतच्या परिसरात भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतीने जलवाहिनीला वॉल्व्ह बसून सुरळीत पाणीपुरवठा करावा, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.
या संदर्भात ग्रामविकास अधिकारी सुभाष लव्हाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.