- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातून अपघातांची संख्या वाढत आहे. या अपघातांसह कौटुंबिक हिंसाचार आणि हाणामारीत जबडा फॅॅ्रक्चर होण्याचे प्रमाण अधिक आहे. गेल्या वर्षभरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांनी तब्बल ११५ जणांचे मोडलेले जबडे वैद्यकीय उपचार आणि शस्त्रक्रियेने पूर्ववत केले.
वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढ, बेशिस्त वाहतूक यासह इतर अनेक कारणांमुळे रस्त्यावर अपघात होतात. जानेवारी ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत शहरात ३८३ अपघात झाले होते, तर २०१९ मध्ये याच कालावधीत ४४२ अपघात झाले. अपघातात मृत्यू पावणाऱ्यांसह जखमींचे प्रमाण चिंताजनक ठरत आहे. अशा अपघातात मेंदूला, हातापायांसह अनेकांच्या जबड्यांच्या हाडांना मार लागतो आणि हाड फ्रॅक्चर होते. अपघातात जखमी झालेले रुग्ण घाटीतील अपघात विभागात दाखल होतात. याठिकाणी अत्यावश्यक उपचार झाल्यानंतर जबड्याच्या फॅ्रक्चरसाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचार केले जातात. त्यासाठी मुखशल्यचिकित्साशास्त्र विभाग महत्त्वाची भूमिका निभावत आहे.
गेल्या वर्षभरात जबडा फ्रॅ क्चर झालेल्या ११५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यातून अपघातासह मारामारी, कौटुंबिक हिंसाचारामुळे जबडा फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले. दुचाकी अपघातात जबडा फॅ्रक्चर झालेल्या अनेक रुग्णांनी हेल्मेट घातलेले नसल्याचे समोर आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघात विभागात दाखल होणाऱ्या अनेकांच्या मेंदूला दुुखापत झालेली असते. त्यामुळे अनेक जण खाजगीत उपचार घेण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे जबडा मोडलेल्या रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असल्याची शक्यता आहे.
चेहरा हा व्यक्तीची ओळख, अस्मितेचे प्रतीक असते. हाणामारीत चेहऱ्यावरच हल्ला केला जातो. कौटुंबिक हिंसाचारातही चेहऱ्यावर मारहाण केली जाते. अशा घटनांसह अपघातात जबडा फॅ्रक्चर होण्याचे प्रकार होतात. चेहरा हा नाजूक भाग आहे. त्यामुळे अनेक म्हणीही चेहऱ्याशी निगडित असल्याचे पाहावयास मिळते. असे शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शिरीष खेडगीकर म्हणाले. अपघातासह विविध कारणांनी जबड्यांना होणाऱ्या दुखापतीवर उपचार होत असल्याचे अधिष्ठाता डॉ. एस.पी. डांगे यांनी सांगितले.
जबड्याला प्लास्टर अशक्यशरीरातील इतर हाडांच्या बाबतीत प्लास्टर करून हाडे स्थिर अवस्थेत राखता येतात; परंतु जबड्यांच्या हाडांना प्लास्टर करता येत नाही. फ्रॅक्चर झालेल्या जबड्यावर दोन पद्धतीने उपचार केले जातात. दोन्ही जबडे एकत्र जोडले जातात. जोडलेल्या अवस्थेत किमान ३ ते ६ आठवडे तरी स्थिर अवस्थेत ठेवले जातात. यासाठी दातांना विशिष्ट प्रकारे वायर गुंफून नंतर खालचा जबडा व वरचा जबडा वायरने एकमेकांना बांधून ठेवावा लागतो. दात आणि गालाच्या पोकळीतून रुग्णाला द्रवपदार्थ दिले जातात. त्यामुळे रुग्णाची उपासमार होत नाही, तर शस्त्रक्रियेद्वारे प्लेट आणि स्कू्रनेही फ्रॅक्चर जबडा पूर्ववत केला जातो.
स्किन ग्राफ्टिंगमोडलेला जबड्यावर उपचार करण्यासह अपघातात चेहऱ्याला जखम झालेल्या रुग्णांवर स्किन ग्राफ्टिंगही केली जाते. यात पायाची त्वचा काढून चेहऱ्याला लावली जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.