नांदेड: शहर वाहतूक व्यवस्थेत सुधारणा व्हाव्यात यासाठी सेफ सिटी प्रकल्पाद्वारे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले़ मुख्य रस्त्यावर एका पॉर्इंटवर तीन-तीन कर्मचारीही तैनात करण्यात आले़ परंतु दंडाच्या टार्गेटचा फंडा पूर्ण करण्याच्या प्रयत्नातच हे कर्मचारी असल्यामुळे ऐन सणासुदीत वाहतुकीचा खोळंबा होत आहे़ मनपाने नेदलँडच्या धर्तीवर बांधलेले शहरातील रस्ते वाहनधारकांच्या पचनी मात्र पडले नसल्याचे वारंवार सिद्ध होत आहे़ या रस्त्यांची कामे करताना, पुढील काही वर्षातील लोकसंख्या व वाहनांच्या वाढीव संख्येचा विचार केला गेला नाही़ त्यामुळे रस्ते अरुंद अन वाहनांचीच संख्या अधिक असल्याचे दिसत आहे़ त्याचा फटका शहर वाहतुकीला बसत आहे़ त्यात आॅटोचालकांचीही मर्यादपेक्षा जास्त संख्या असल्यामुळे त्यात भरच पडली आहे़ प्रादेशिक परिवहन विभागही शहरात किती आॅटो चालतात याबाबत अनभिज्ञ आहे़ त्यात नवीन परवाने वाटपाचे कामही जोमाने सुरु आहे़ आरटीओ विभाग नवीन योजना राबविण्याच्या नावाखाली आपली पाठ थोपटून घेण्यातच धन्यता मानत आहे़ तर दुसरीकडे शहर वाहतूक शाखेलाही वाहतुकीला शिस्त लावण्याविषयी काही देणे-घेणे नसल्याचेच स्पष्ट होत आहे़ सेफ सिटी प्रकल्पाअंतर्गत शहरातील मुख्य ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले़ परंतु या कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीला किती प्रमाणात शिस्त लागली हा संशोधनाचा विषय आहे़ मुख्य रस्त्यावर शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी आहेत़ परंतु तरीही सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या कमी झाली नाही़ बेशिस्त आॅटोचालकांनी तर वाहनधारकांच्या नाकात दम केला आहे़ त्यांना शिस्तीचे धडे देण्याचे काम असलेली वाहतूक शाखा मात्र केवळ टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली दुचाकीस्वारांवर दंडाचे फंडे आजमावत आहे़ याचा परिणाम म्हणून शहरात कलामंदिर, शिवाजीनगर, श्रीनगर, डॉक्टरलेन, वजिराबाद आदी भागात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे़ (प्रतिनिधी)
टार्गेटचा फंडा अन् वाहतुकीचा खोळंबा
By admin | Published: September 07, 2014 11:57 PM