औरंगाबाद: २२०० कोटीच्या ठेवी ३ हजार कोटीपर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांनी सोमवारी जाहीर केले.
बँकेची ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेसमोरचे सर्वच विषय मंजूर करण्यात आले. या सभेत बँकेचे संचालक, रोहयोमंत्री संदीपान भुमरे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे मुंबईहून जोडले गेले होते तर प्रत्यक्षात बँकेच्या सभागृहात स्वतः नितीन पाटील, ज्येष्ठ संचालक हरिभाऊ बागडे, जगन्नाथ काळे, जावेद पटेल, नूतन संचालक अभिषेक जैस्वाल, देवयानी डोणगावकर आदींची उपस्थिती होती. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आर. आर. शिंदे यांनी विषय पत्रिका वाचून दाखवली.
कर्जमाफीमुळे बँकेचा नफा वाढला आहे. तो आठ ते साडेआठ कोटीच्या घरात गेला आहे. यापुढे हा नफा कमी होता कामा नये, उलट तो वाढतच राहिला पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन करीत पाटील यांनी, अनिष्ट फरकाची बँकेची सुमारे साडेतीनशे कोटी पेक्षा अधिक रक्कम शासनाने द्यावी यासाठी संदीपान भुमरे व अब्दुल सत्तार यांनी शासन दरबारी नक्की प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.
बिगर शेती शेतकी कर्ज वाटप झाल्यास बँकेला चांगला नफा होईल म्हणून साडेतीनशे कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागातील लहान व्यावसायिकांना कर्ज देण्यावर बँक भर देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पोखरा योजनेअंतर्गत झालेल्या कर्ज वाटपाची सबसिडी बँकेला लवकर न मिळाल्याने ही योजना सबसिडी मिळाल्यावरच राबवता येईल असेही नितीन पाटील यांनी जाहीर केले.
नितीन पाटील यांची ही भूमिका योग्य वाटत नाही. पोखरा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून ८० टक्के सबसिडी मिळते. ती मिळण्यास थोडाफार उशीर होत असला तरी शेतकऱ्यांना या योजनेचा पुरेपूर लाभ मिळवून देण्याची भूमिका बँकेने घ्यायला हवी अशी प्रतिक्रिया जगन्नाथ काळे यांनी व्यक्त केली.
सभेत ज्येष्ठ संचालक हरिभाऊ बागडे उपस्थित होते परंतु त्यांनी आपले मत यावेळी नोंदवले नाही. उपाध्यक्ष दामुअण्णा नवपुते यांनी शेवटी आभार मानले.