औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून उदयपूर विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी बुधवारी एअर इंडियाकडे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कोलंबो - मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणण्याची मागणी केली. विमानतळासाठी कस्टमचे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी विमानतळ सज्ज आहे. बुद्धिस्ट सर्किटच्या कनेक्टिव्हिटीसह आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी यापुढे प्रयत्न आणि पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास विमानतळ प्राधिकरण आणि उद्योजकांनी व्यक्त केला.
एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद- उदयपूर विमानाच्या उड्डाणानंतर बुधवारी उपस्थित मान्यवरांनी विमानसेवेसंदर्भात संवाद साधला. हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, एअर इंडियाने अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. एखादी विमानसेवा सुरू झाली की, त्याला प्रतिसाद वाढत जातो, हे स्पाईस जेटच्या औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेवरून दिसून येत आहे. विविध शहरांसाठी विमानसेवेची मागणी करण्यात आलेली आहे. गया येथे यावर्षी थायलंडहून आंतरराष्ट्रीय विमाने येणार आहेत. ही विमाने औरंगाबादला आणण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबाद-भोपाळ- गया अशी विमानसेवा शक्य आहे. गया येथे जाणारे लोक नंतर वाराणसी, लखनऊ येथे जातात. तेथून ते परत थायलंडला जातात. ही विमान वाहतूक औरंगाबादला आली पाहिजे, असे ते म्हणाले. उद्योजक ऋषी बागला म्हणाले, औरंगाबादेत ऐतिहासिक, धार्मिकस्थळे आहेत. ‘डीएमआयसी’मुळे देशातील पहिले मॉडर्न शहर होत आहे. विमानसेवा उपलब्ध होत असल्याने पुढे वापर वाढत जाईल. इटालीहून औरंगाबादला येण्यासाठी ३६ घंटे लागतात. हा वेळ कमी होण्याची गरज आहे.
५० विमाने हाताळण्याची क्षमतायाप्रसंगी कोलंबो - मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणावे, अशी मागणी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी एअर इंडियाचे सेल्स व्यवस्थापक संतोष नायर यांच्याकडे केली. चिकलठाणा विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता आहे. नाईट पार्किंगची सुविधा मोफत दिली जात आहे. त्या माध्यमातूनही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे साळवे यांनी सांगितले.
प्राधिकरणाने दिले प्रस्तावथायलंडच्या राजदूताना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनाही प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. यासह अन्य देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.