औरंगाबाद : रस्त्यावरील वाहने उचलून नेणाऱ्या वाहतूक पोलिसांनी केवळ दुचाकीस्वारांनाच लक्ष्य केल्याचे समोर आले. विशेष म्हणजे काही बँका आणि रुग्णालये आणि विशिष्ट अशा ठिकाणीच वाहतूक पोलिसांची ही उचलेगिरी सुरू आहे.
शहरातील वाहतूक नियमन करण्यासाठी आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईसाठी स्वतंत्र वाहतूक विभाग कार्यरत आहे. सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहर, सिडको, वाळूज आणि छावणी अशा चार विभागांत चार पोलीस निरीक्षक, १५ पोलीस अधिकारी आणि साडेतीनशे पोलीस वाहतूक विभागात कार्यरत आहेत. वाहतूक सिग्नल सांभाळण्यासोबतच बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई या विभागाकडून केली जाते. रस्त्यावर उभी करून ठेवलेल्या वाहनामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो, यामुळे अशी कार आणि दुचाकी उचलून नेण्यासाठी वाहतूक शाखेकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली.
क्रेनच्या साहाय्याने कार टोर्इंग करून पोलीस घेऊन जातात. वाहने उचलून नेण्यासाठी प्रत्येक विभागाकडे भाडेतत्त्वावर घेतलेले वाहन आणि उचलेगिरी करणारे पाच ते सहा रोजंदारी कामगार त्या कंत्राटदाराचे असतात. केवळ रस्त्यावरील वाहनेच उचलून नेणे हे त्यांचे काम आहे, असे असताना वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या चारचाकी वाहनांकडे दुर्लक्ष करून वाहतूक पोलीस केवळ दुचाकींना लक्ष्य करीत आहेत. चारचाकी नेण्यासाठी शहर वाहतूक शाखेकडे क्रेन उपलब्ध नाही. केवळ सिडको शाखेने भाडेतत्त्वावर दोन क्रे न घेतले आहेत.
पार्किंगमधील दुचाकी उचलून नेण्याचे गौडबंगालवाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील दुचाकी उचलून नेऊन संबंधित वाहनचालकांवर कारवाई करण्यास कोणाचाही आक्षेप नाही. मात्र, वाहनचालक घाटी रुग्णालय, सिडको, हडकोतील विविध बँका आणि दुकानांसमोरील पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या दुचाकी उचलून नेतात. पार्किंगमधील दुचाकी उचलून नेण्याचे काय गौडबंगाल आहे हे मात्र समजू शकले नाही. पुंडलिकनगर ते गजानन महाराज मंदिर रस्ता, सिडको, बजरंग चौक रस्ता, सिडको एन-३, एन-४ सारख्या वसाहतीतही अशा प्रकारची नियमित उचलेगिरी सुरू आहे. पार्किंगमधील दुचाकी का उचलताय, असा जाब विचारल्यास वाहने उचलण्याचे काम करणारी गुंड प्रवृत्तीचे मुले वाहनचालकांना मारहाण करतात.
वाहनांचे होते नुकसानदुचाकी उचलून वाहनात ठेवताना आणि खाली उतरविण्याचे काम करणारे रोजंदारीवरील कामगार हे अत्यंत बेजबाबदारपणे वागतात. दुचाकी उचलून नेणे आणि उतरविताना वाहनांचे इंडिकेटर तुटते, वाहनांवर स्क्रॅचेस पडतात. या नुकसानीबद्दल जाब विचारल्यास कर्मचारी वाहनचालकांशी हुज्जत घालतात. विशेष म्हणजे वाहतूक पोलीसही वाहनचालकांना धमकावतात, असा अनुभव अनेक वाहनचालकांना आलेला आहे.
जास्तीच्या कमाईसाठी नियम मोडून दुचाकींची उचलेगिरीवाहतुकीला अडसर ठरणारी वाहने रस्त्यावरून हटविणे हा एकमेव उद्देश वाहतूक पोलिसांचा असला पाहिजे. मात्र, केवळ जास्तीत जास्त कमाई करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर नसलेली वाहनेही उचलून नेऊन वाहनचालकांना त्रास देण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू आहे. ही बाब वाहतूक पोलीस निरीक्षकांच्या लक्षात येत नाही अथवा ते याकडे मुद्दामहून दुर्लक्ष का करतात, असा प्रश्न उपस्थित होतो. उचलेगिरी करणाऱ्या संबंधित कंत्राटदाराला प्रत्येक गाडीमागे मोबदला मिळतो आणि जास्तीत जास्त मोबदला मिळविण्यासाठी वाहने उचलून नेण्याचे काम सध्या शहरात सुरू आहे.
आधी अलाऊसिंग करा मगच वाहने उचलून न्या...वाहन उचलून नेण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी लाऊडस्पीकरद्वारे वाहनचालकांना आव्हान करून रस्त्यावरील वाहने काढण्याचे सांगावे. त्यानंतरही जर वाहन रस्त्यावर उभे असल्यास ते वाहन उचलून नेता येते. केवळ वाहतुकीला अडथळा निर्माण करणारी रस्त्यावर उभी वाहने उचलावी.वाहन उचलून नेल्यानंतर तेथे मार्किंग करा आणि वाहतूक शाखेचा क्रमांक लिहावा. जेणेकरून वाहन पोलिसांनी नेल्याचे वाहनचालकांच्या लक्षात येईल.