औरंगाबाद : दोन सत्र परीक्षांमधील ९० दिवसांच्या अंतरात महाविद्यालये तसेच विद्यापीठ परिसरातील विभागांनी किती अभ्यासक्रम शिकवला, याचा ताळमेळ न लावता विद्यापीठाचा परीक्षा घेण्यावरच जोर असल्याचे दिसत आहे. मे महिन्यात पहिल्या सहामाही परीक्षा आटोपल्यानंतर आता दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर २९ जुलैपासून दुसऱ्या सहामाही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत.
विद्यापीठाने दुसऱ्या सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बीए, बीएस्सी, बीकॉम या पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय व तृतीय वर्षांच्या परीक्षा २९ जुलैपासून सुरू होतील, तर प्रथम वर्षाच्या परीक्षांना १० ऑगस्टपासून प्रारंभ होईल. सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा १७ ऑगस्ट आणि २० ऑगस्टपासून अभियांत्रिकी, फार्मसी, विधी या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.
नियमानुसार दोन परीक्षांमध्ये कमीत कमी ९० दिवसांचे अंतर असावे लागते. या दिवसांत परीक्षेसाठी विहित केलेला विविध विद्याशाखांचा अभ्यासक्रम शिकवणे बंधनकारक असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेेल्या दीड वर्षापासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे वर्ग बंद आहेत. ऑनलाइन तासिकाद्वारे शिकविण्याचे प्राध्यापकांना आदेश आहेत; परंतु अनेकदा ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या असल्यामुळे विद्यार्थी या तासिकांना प्रतिसाद देत नाही, असे कारण सांगितले जाते. काही मोठ्या संस्थांची महाविद्यालये सोडली, तर अनेक महाविद्यालये व विद्यापीठातील काही विभागांच्या तासिका कागदावरच दाखविल्या जातात. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नसताना विद्यापीठाने परीक्षांची घाई केलेली आहे, असा आरोप ‘एसएफआय’ या विद्यार्थी संघटनेचे लोकेश कांबळे, ‘एनएसयूआय’चे नीलेश आंबेवाडीकर, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रकाश इंगळे यांनी केला आहे.
ऑनलाइन तासिकांचे रेकॉर्ड तपासले जातेमिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी सांगितले की, गेल्या वर्षापासून कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्र विस्कळीत झाले आहेत. महाविद्यालयांचे संपूर्ण वेळापत्रक यामुळे कोलमडले आहे. ते पूर्वपदावर आणण्यासाठी विद्यापीठामार्फत परीक्षा वेळेवर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महाविद्यालये बंद असल्यामुळे ऑनलाइन तासिका घेतल्या जात आहेत. प्राध्यापकांनी घेतलेल्या या तासिकांची पडताळणी केली जाते. या तासिकांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाते. त्यासंबंधी काही व्हिडिओ क्लिपिंग देखील आम्ही तपासतो.