औरंगाबाद : मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या वाहनांमध्ये दोन प्रशिक्षणार्थी बसवून शिकवण्याची परवानगी देण्याची मागणी औरंगाबाद जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
गेल्या एका वर्षांपासून मोटार ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. वाहनांचे हप्ते थकले असून कार्यालयांचे भाडेही देणे सध्या शक्य नाही. त्यात ब्रेक द चैन च्या माध्यमातून निर्बंध आणताना परिवहन विभागाच्या मुख्य घटकाकडे दुर्लक्ष झाले आहे. ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून हजारो प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांची उपजीविका भागते. ते सर्व मोटार ड्रायव्हिंग स्कूलवर अवलंबून आहेत. या लाॅकडाऊनमुळे आता पुन्हा उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा व टॅक्सीच्या धर्तीवर एकावेळी दोन प्रशिक्षणार्थी बसवून ड्रायव्हिंग शिकवण्याची परवानगी द्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा असोसिएशनने निवेदनात दिला आहे. निवेदनावर अध्यक्ष अनिल घोरपडे, सचिव गोरक्षनाथ वायभासे आदींच्या सह्या आहेत.