नांदेड : मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याबाबत राज्य सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही़ त्यामुळे मातंग समाजाने सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन मातंग आरक्षण हक्क परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या विभागीय बैठकीत मातंग समाजातील नेत्यांनी केले़ ताज पाटील हॉटेल येथे शनिवारी आयोजित केलेल्या बैठकीस मानवी हक्क अभियानचे अॅड़ एकनाथ आव्हाड, दलित महासंघाचे प्रा़ मच्छिंद्र सकटे, माजी आ़ अविनाश घाटे, अॅड़ दयानंद भांगे, डॉ़ माधव गादेकर, प्रा़ जी़ एस़ वाघमारे, दिलीप आगळे, मारोती वाडेकर, संभाजी मंडगीकर, अॅड़ रानवळकर, लालबाजी घाटे, शिवा कांबळे, गणेश तादलापूरकर, श्याम कांबळे यांची उपस्थिती होती़ सरकारने मातंग समाजावर अन्याय केला़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मातंग समाजाने संघटित होऊन मताचा उपयोग शस्त्र म्हणून करावा, असे आवाहन प्रा़ सकटे यांनी केले़ अॅड़ एकनाथ आव्हाड यांनी, मातंग समाज व तत्सम जातींना आरक्षण द्यावे़ यासाठी १३ टक्के व पूर्वीचे ३ टक्के असे मिळून अनुसूचित जातीच्या १६ टक्के आरक्षणात अ, ब, क, ड असे वर्गीकरण करण्याची मागणी केली़ अॅड़ भांगे यांनी आरक्षणाबाबत काही तांत्रिक व कायद्याच्या बाबी स्पष्ट केल्या़ लोकसंख्येच्या आधारावर मातंग आरक्षणाची मागणी न्यायिक व कायद्याच्या चौकटीत बसणारी असल्याचे ते म्हणाले़ मातंग समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी राज्यभर आंदोलन करणार असल्याची भूमिका परिषदेचे निमंत्रक अविनाश घाटे यांनी व्यक्त केली़ प्रारंभी सादर केलेला क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोग ग्राह्य धरावा तसेच मातंग समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी सर्वच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन राजकीय पक्षाची स्थापना करावी, असा ठराव परिषदेत घेण्यात आला़ बैठकीस प्रा़ कन्हैया पाटोळे, लालसेनेचे गणपत भिसे, बबन शिर्के, रामचंद्र भरांडे, के़ डी़ उफाडे, सतीश कवडे, प्रा़ शंकर गड्डमवार, रविंद्र भालेराव, नामदेव गुंडीले, श्याम गडंबे आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
सरकारला धडा शिकवा : मांतग आरक्षण परिषदेत ठराव
By admin | Published: September 13, 2014 11:38 PM