लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दरवर्षी ३१ मेपर्यंत शिक्षकांच्या होणाºया बदल्या यंदा सप्टेंबर उलटत आला तरी अद्याप झालेल्याच नाहीत. रोज नवे परिपत्रक, रोज नव्या सूचना ऐकून शिक्षकांप्रमाणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही वैतागला आहे. आज गुरुवारी ग्रामविकास विभागाच्या सचिवांसोबत झालेल्या ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’मध्ये ३० सप्टेंबरपर्यंत बदल्या उरकल्या जातील. सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीपात्र शिक्षकांसाठी मात्र बदल्यांची प्रक्रिया यंदा राबविण्यात येणार नसल्याचे संकेत मिळालेआहेत.संवर्ग- १ मध्ये गंभीर आजाराने त्रस्त शिक्षक, संवर्ग- २ मध्ये पती- पत्नी एकत्रीकरण आणि संवर्ग-३ मध्ये अवघड क्षेत्रात काम करणाºया शिक्षकांचा समावेश आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला. या शासन निर्णयानुसार दुर्गम आणि सोप्या क्षेत्रात कार्यरत शिक्षकांसाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्यात आले. अवघड क्षेत्रात सलग ३ वर्षे सेवा करणारे शिक्षक बदली अधिकार पात्र आणि सर्वसाधारण क्षेत्रात सलग १० वर्षे सेवा करणारे शिक्षक बदलीपात्र शिक्षक म्हणून जाहीर करण्यात आले. या शिक्षकांची बदली प्रक्रिया जिल्हास्तरावरून न करता राज्यस्तरावरून राबविण्यात येत आहे. शिक्षकांना पदस्थापना अर्थात थेट शाळाही राज्यस्तरावरूनच आॅनलाइन दिली जाणार आहे.त्यानुसार बदलीसाठी पहिल्यांदा संवर्ग- १ मधील शिक्षक आणि त्यानंतर संवर्ग- २ मधील शिक्षकांनी आॅनलाइन नोंदणी केली. या दोन्ही संवर्गातील जवळपास ४०० ते ४५० शिक्षकांनी आॅनलाइन नोंदणी केलेली आहे. राज्यस्तरावरून त्यांची बदली प्रक्रियादेखील पूर्ण होऊन जवळपास महिनाभरापासून हे शिक्षक ‘पोस्टिंग’च्या प्रतीक्षेत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाºयांसाठी देण्यात आलेली ‘लॉगिंग’ खुली करण्यात न आल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांना पदस्थापनेचे आदेश निर्गमित करणे शक्य झालेले नाही. तथापि, उद्यापासून संवर्ग- ३ मध्ये असणाºया ३८९ शिक्षकांना बदलीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी सुरू केली जाणार आहे.
शिक्षक बदली; घोळ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 1:05 AM