नांदेड : व्याजाने घेतलेल्या पैशांच्या परतफेडीसाठी देणेकऱ्यांनी लावलेल्या तगाद्याला वैतागूनच एका शिक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी घडली होती. मृत्यूपूर्वीशिक्षकाने लिहिलेल्या चिठ्ठीत २८ जणांची नावे असून देवाण-घेवाणीचा आकडाही मोठा आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
कॅनाल रस्त्यावरील श्रीकृष्णनगर भागात राहणारे प्रशांत पंढरीनाथ इंदूरकर (४६) हे मूळचे कंधार तालुक्यातील रहाटी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी जवळपास २८ जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाने घेतलेले पैसे परत न केल्यामुळे देणेकरी त्यांना रात्री-अपरात्री धमक्या देत होते. नेहमी होणाऱ्या या त्रासाला कंटाळून इंदूरकर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची तक्रार त्यांची पत्नी नम्रता इंदूरकर यांनी दिली. मृत्यूपूर्वी इंदूरकर यांनी तीन पानांचे पत्र लिहून ठेवले होते. या सुसाईड नोटमध्ये २८ जणांची नावे असून त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा उल्लेख आहे.
पो.नि.अभिमन्यू सोळंके यांनी तपासाची चक्रे फिरविली. या प्रकरणात होनराव केरबा, होनराव यांची पत्नी, मुलगा, संजय पवार व त्यांची पत्नी, बालाजी पवार व त्यांची पत्नी, मुलगा नागेश व गोविंद, संतोष देशमुख, शिक्षक श्रीकांत हळदेकर व त्यांची पत्नी, दादाराव गणपतराव बुक्तरे, वनराज बुक्तरे, पुरुषोत्तम बुक्तरे, आनंद सावंत त्यांचा मुलगा, मुलगी, रामेश्वर पोपुलवाड, शिक्षक दादाराव नवघरे व त्यांची पत्नी, मनिष वडजे व त्यांचा मुलगा, माधव पवळे, शेख मुख्तार, शेख सुमेर, शेख समदानी व इतर तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरू आहे.