औरंगाबाद : खासगी शिक्षण संस्था सेवाभावी संस्था असून त्यातील कर्मचारी भरतीचा अधिकार हा त्या संस्थांचा आहे. पारदर्शक नाेकरी भरती या गाेंडस नावाखाली शिक्षकांची लेखी परीक्षा घेऊन त्यातील गुणांच्या आधारे थेट भरतीचा प्रस्ताव शासनाने तयार केला आहे. या पाेर्टलवरील परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पवित्र पाेर्टलचा फेरविचार व्हावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांनी केली आहे तसेच शाळांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणीही त्यांनी केली.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष गेल्यावर्षी सुरू झाले तर त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून ११ वर्षे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे काम केले. त्या महामंडळाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष. यानिमित्त नाशिकमध्ये १८ व १९ नाेव्हेंबरला अधिवेशन आयाेजित केले आहे. वसंतदादांचे व्यक्तिमत्त्व तरुण व पुढील पिढ्यांना माहिती व्हावे, यासाठी राज्यभर जिल्हास्तरावर एक निबंध स्पर्धा आयाेजित करून त्यामधील निवडक निबंधांची स्मरणिका काढण्यात येणार आहे. महामंडळाच्या बालेवाडी येथील कार्यालयासह राज्यातही इतर ठिकाणी पूर्णाकृती, अर्धाकृती पुतळे उभे करण्यासह तैलचित्रही लावण्यात येणार असल्याची माहिती नवल पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेस महामंडळाचे सहकार्यवाह एस. पी. जवळकर, मिलिंद पाटील, वाल्मिक सुराशे, शिवाजी बनकर आदींची उपस्थिती होती.