छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या कांचनवाडी येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिल्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने कटर आणला. एका मुलाचे त्याने बोट कापले, दुसऱ्याच्या गळ्याला कटर लावला. अन्य विद्यार्थ्यांनी त्याला पकडून शिक्षकांना बोलावून आणले. शिक्षक भरत बरडे यांनी या विद्यार्थ्यास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली. विद्यार्थ्यास मारहाण केल्याने शिक्षकाला मंगळवारी निलंबित करण्यात आल्याची माहिती उपायुक्त नंदा गायकवाड यांनी दिली.
महापालिकेच्या शाळा स्मार्ट बनविण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे. त्यात एकानंतर एक प्रकार महापालिका शाळांमध्ये घडत आहेत. शनिवारी कांचनवाडी प्राथमिक शाळेत एका पाच वर्षीय चिमुकल्याने वर्गात कटर आणून दहशत निर्माण केली. त्याने अगोदर एका मुलाच्या बोटाला दुखापत केली. चिमुकला एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने अन्य एकाच्या गळ्याला चक्क कटर लावला. वर्गातील विद्यार्थी भयभीत झाले. त्याला पकडून वर्गशिक्षकाला धावत जाऊन बोलावून आणले. शिक्षक भरत बरडे यांना हा सर्व प्रकार पाहून राग अनावर झाला. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.
मुलाला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वच एकच खळबळ उडाली. प्रशासनही खडबडून जागे झाले. नेमका प्रकार काय, हे जाणून घेण्यात आले. शिक्षकाने विद्यार्थ्याची समजूत घालायला हवी होती. त्याच्या पालकांना बोलावून समज देणे अपेक्षित होते. अमानुष मारहाण करणे योग्य नसल्याचे वरिष्ठांच्या चौकशीत निदर्शनास आले. प्रशासकांच्या आदेशावरून मंगळवारी सायंकाळी शिक्षक बरडे यांना निलंबित केल्याची माहिती उपायुक्त गायकवाड यांनी दिली.