औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाॅकडाऊनमध्येही शिक्षणाचा दीप अखंडपणे तेवत ठेवणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक सनी गायकवाड यांचे प्रयत्न आणि लोकसहभागातून गाजरमळ्याची शाळा नावारूपाला येत आहे. दरवर्षी नवोदय विद्यालयात, सैनिकी शाळेत विद्यार्थ्यांची निवड होत असते. इयत्ता पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांच्या हाती टॅब आल्याने कोरोनाकाळात लाॅकडाऊनमध्येही येथील विद्यार्थी १०० टक्के ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले आहेत. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा ही गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे प्रकाशझोतात येत आहे.
शहरापासून ३५ किमी. अंतरावर गाजरमळा ही ७५ ते ८० घरांची वस्ती आहे. या वस्तीवर २००३ मध्ये सुरू झालेली वस्तीशाळा आणि २०१० नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रूपांतरित झाली. २०१६ मध्ये येथील राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाशिवाय स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी एनसीईआरटीचा अभ्यासक्रमही पूर्ण करून घेत आहे. गुणवत्तेच्या शिक्षणामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला शेजारच्या मंमदपूर, लासूर स्टेशन, देवळी, गाजगाव, गवळी शिवरा, औरंगाबाद येथील विद्यार्थी शाळेत प्रवेशित आहेत. तर वस्तीवरील १० ते १५ मुलेही शाळेत शिकतात.
ही शाळा दोन शिक्षकी असून, सहशिक्षका वैशाली गौंड यांच्या मदतीने सनी गायकवाड विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेची खास तयारी करून घेत असल्याने दरवर्षी नवोदय विद्यालय, कन्नड आणि चंद्रपूरच्या सैनिकी शाळेत २०१६ पासून विद्यार्थी प्रवेशाला पात्र ठरत आहेत. तसेच पाचवीच्या शिष्यवृती परीक्षेतही चार ते पाच विद्यार्थी आतापर्यंत यशस्वी झाले आहेत. लोकसहभाग व लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेसाठी सर्व भौतिक सुविधा उभारल्याने शाळेचा चेहरामोहरा बदलला आहे. शाळेत ब्राॅडबॅण्ड इंटरनेट कनेक्शनमुळे वाडीवस्तीवरच्या विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन गोष्टी शिकता येत आहेत. पत्र्याचे शेड असलेल्या शाळेत भौतिक सुविधांची केलेली पूर्तता आज शहरी शाळांनाही लाजवणारी आहे. आयएसओ मिळवण्यापर्यंत मजल मारलेली ही शाळा एका शिक्षकाच्या जिद्द व चिकाटीचे आदर्श उदाहरण ठरले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेनेही शाळेचा उल्लेखनीय आदर्श शाळा म्हणून गौरव केला.
----
इयत्ता पहिलीचे १० व दुसरीचे ११ विद्यार्थी टॅबच्या मदतीने शिकत आहे. इतर विद्यार्थ्यांना कोरोनाकाळात मदतीसाठी विषयमित्र, वर्गमित्र ही संकल्पना राबवून सातवी-आठवीच्या विद्यार्थ्यांच्या देखरेखीत विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करून घेतला. गटमित्रांच्या मदतीने गटशाळा चालवली. सध्या सेतू अभ्यासक्रम शिकवत आहोत. शाळेतील १०० टक्के विद्यार्थ्यांना कोरोनाकाळातही शिकता आले. यात खंड पडणार नाही याची काळजी घेत लोकसहभागातून टॅब, डेन्सफाॅरेस्टसाठी जागा उपलब्ध केली.
-सनी गायकवाड, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गाजरमळा
---
फोटो ओळ : नवोदय व सैनिक स्कूलमध्ये निवड झालेले विद्यार्थी गौरव सोहळ्यात शिक्षक, विद्यार्थी व गावकरी, पालक.