औरंगाबाद :मराठवाडाशिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यावेळी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांपुढे बंडखोरांनी तगडे आव्हान उभे केले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिष्टाईनंतरही नितीन कुलकर्णी यांनी माघार न घेतल्यामुळे पक्षाचे उमेदवार किरण पाटील यांना निवडणूक अवघड बनली आहे.
दोन महिन्यांपूर्वीच पक्षात आलेले पाटील यांना शिक्षक मतदार नोंदणीला वेळ मिळाला नाही. आता बंडखोरीमुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला २४ हजार ८०९ मते मिळाली होती. पहिल्या पसंतीची मते कमी मिळाल्यामुळे कोटा पूर्ण झाला नव्हता. भाजपपुरस्कृत उमेदवार प्रा. सतीश पत्की यांना १२ हजार २९८ मते मिळाली होती. मतदार नोंदणीत भाजपने फारसे परिश्रम न घेतल्यामुळे तीन निवडणुका भाजपच्या हातून गेल्या. यंदा बंडखोरीमुळे भाजपला दगाफटका होण्याची शक्यता आहे. ३० जानेवारी रोजी मतदान आहे. आठ दिवसांत शिक्षक मतदारांपर्यंत उमेदवार पोहोचलाच नाही तर भाजपला पदवीधर मतदारसंघाप्रमाणे या निवडणुकीतही नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मराठवाड्यात २० जानेवारी रोजी सुमारे १० मेळावे घेत शिक्षक मतदारांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला; पण त्यास अल्प प्रतिसाद मिळाला.
भाजपचा दबाव झुगारला : कुलकर्णीसतत अन्याय होत असल्याने यावेळी मी भाजपचा दबाव झुगारून मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या मैदानात उडी घेतली आहे. माझी लढाई राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आ. विक्रम काळे यांच्याविरुद्ध आहे. भाजपच्या उमेदवाराचे नावदेखील मला घ्यायला आवडणार नाही, असे शुक्रवारी नितीन कुलकर्णी यांनी पत्रपरिषदेत सांगितले. राष्ट्रवादीचे बंडखोर प्रदीप सोळुंके आणि मी दोघेही समदु:खी असल्याचे ते म्हणाले. मी आजही भाजपचाच उमेदवार असून, माझी कुणाविरुध्द तक्रार नाही. मला पक्षातून काढण्याची हिंमत भाजप दाखवू शकणार नाही. भाजपमधल्या रणनीतिकारांनी माझा ‘गेम’ केला, असा आरोप करीत कुलकर्णी यांनी त्यांची नावे सांगायला नकार दिला.