औरंगाबाद : विद्यार्थ्यांना ज्ञान देणे आणि सुसंस्कृत करणे हा शिक्षकांचा धर्म आहे. त्याचा विसर न पडू देता शिक्षकांनी आदर्श समाज निर्मितीचे ‘रोल मॉडेल’ बनावे, असे प्रतिपादन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण समारंभात डॉ. नारनवरे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उच्च शिक्षण क्षेत्रात अध्ययन, अध्यापन व संशोधनाचे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ९ प्राध्यापकांना विद्यापीठाने शिक्षकदिनी ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन सन्मानित केले. विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. या समारंभात जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे व कुलगुरू डॉ. चोपडे यांच्या हस्ते विद्यापीठातील इंग्रजी विभागाचे प्राध्यापक तथा मौलाना आझाद अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. हमीद खान, भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम.डी. शिरसाट, संगणकशास्त्र विभागातील प्रा. डॉ. भारती गवळी, रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्रा. डॉ. बापू शिंगटे, याशिवाय संलग्नित महाविद्यालयातील ५ प्राध्यापकांपैकी जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालयाचे डॉ. नारायण बोराडे, देवगिरी महाविद्यालयाचे डॉ. एस. एम. हेळंबे, अंबड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे डॉ. मिलिंद पंडित, उमरगा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे डॉ. संजय अस्वले व बीड येथील बलभीम महाविद्यालयाचे डॉ. विद्यासागर पाटांगणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी डॉ. नारनवरे म्हणाले की, आजचे विद्यार्थी हीच राष्ट्राची संपत्ती आहे. विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी केले पाहिजे. विद्यापीठामध्ये सर्व भौतिक सुविधा आहेत; पण विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, इच्छाशक्ती नसेल तर संशोधनामध्ये अपेक्षित काम होणार नाही. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संशोधन केले पाहिजे. ते राष्ट्रहितासाठी लाभदायी ठरेल. यावेळी कुलगुरू डॉ. कोणत्याही देशाच्या निर्मितीमध्ये शिक्षकांचे योगदान मोठे राहिलेले आहे. त्यामुळे जगातील अनेक देशांत शिक्षक दिन साजरा करून शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. भारतात प्राचीन काळापासून शिक्षकांचे योगदान राहिलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षकांसाठी अध्ययन, अध्यापन व संशोधन ही तीनच कामे आयुष्यभर केली पाहिजेत. बाबासाहेबांच्या या विचाराने शिक्षकांनी विद्यापीठाची प्रतिमा उंचाविली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलसचिव डॉ. धनराज माने यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. चेतना सोनकांबळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार राजेश करपे यांनी मानले.
शिक्षकांनी ‘रोल मॉडेल’ व्हावे
By admin | Published: September 07, 2014 12:46 AM