औरंगाबाद : शाळांमध्ये सकाळी वेळेत न येणारे शिक्षक न सांगता अनुपस्थितीत राहणारे, शाळा सुटण्याअगोदर निघून जाणे, टाचन न काढणारे व गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षकांना लगाम घालण्यासाठी सोमवारी जिल्ह्यातील दुर्गम भागातील अनेक शाळांची अचानक तपासणी करण्यात आली. तथापि, तपासणीची ही बातमी फुटल्यामुळे अनेक ‘लेटलतीफ’ शिक्षकांची चांगलीच धांदल उडाली.
सर्वसाधारण सभा असेल, स्थायी समितीची बैठक असेल किंवा शिक्षण समितीच्या बैठकांमध्ये सातत्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांतील मुलांना लिहिता- वाचता येत नाही. शिक्षक वेळेवर शाळेत येत नाहीत. गैरहजर असतात, अशा तक्रारींचा पाढा वाचला जातो. अनेक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्यादेखील याच तक्रारी आहेत. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांनी प्राप्त तक्रारींची गांभीर्याने दखल घेत शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल यांना याबाबत उपाययोजना आखण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी दोन दिवस बसून शाळा तपासणीचा कार्यक्रम आखला.
शाळा तपासणीची अत्यंत गोपनीयता बाळगत शिक्षणाधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी ७.३० वाजता सर्व गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, गटसाधन केंद्रांतील साधन व्यक्ती आदी जवळपास २०० जणांना त्या त्या पंचायत समित्यांच्या साधन केंद्रांमध्ये बोलावून घेतले व एकाच वेळी दुर्गम भागातील शाळा तपासणीच्या सूचना केल्या. तरीही ही बातमी फुटली. त्यामुळे शाळा तपासणीसाठी अधिकारी-कर्मचारी शाळांवर पोहोचण्यापूर्वीच अनेक ‘लेटलतीफ’ शिक्षकांची धावपळ सुरू झाली.
सकाळी ८ वाजता तपासणी अधिकारी बाहेर पडले. ते ठरवून दिलेल्या शाळांमध्ये सकाळी ९ वाजता धडकले. तपासणी अधिकाऱ्यांनी शिक्षक हे शाळेत वेळेत येतात की नाही, शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा, टाचण वह्यांमधील नोंदी, विद्यार्थ्यांची उपस्थिती, शालेय अभिलेख्यांची तपासणी केली. यामध्ये अनेक शिक्षक गैरहजर आढळून आले, तर अनेकजण शाळांमध्ये उशिरा दाखल झाल्याचेही आढळून आले. यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयांमध्ये अहवाल तयार करण्याचे काम सुरू होते.
२०० पेक्षा जास्त शाळांची तपासणीशिक्षण विभागाने केलेल्या अचानक तपासणीमुळे आणि आपल्या शाळेत पथक येऊ शकते या भीतीपोटी शिक्षकांची धावपळ उडाली. दरम्यान, २०० वर शाळांना भेटी देण्यात आल्या असून, यामागे शिक्षकांना घाबरविण्याचा उद्देश नसल्याचे शिक्षणाधिकारी एस. पी. जैस्वाल म्हणाले.