औरंगाबाद : नफा- तोट्याचे गणित न मांडता उद्योग टिकला, तर आपले भवितव्य टिकेल, या भावनेतून मालकांपासून कामगारांपर्यंत सर्वजण कामाला लागले आहेत. ही माझी जबाबदारी नाही, अशी मानसिकता न बाळगता उद्योगाच्या वाढीसाठी सांघिक भावनेतून काम करत आहेत, हा सर्वात मोठा बदल कोरोनामुळे आला, असे मत ‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष रमन अजगावकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
मागील वर्षी कोरोनाची मोठी लाट आली आणि संपूर्ण जग ठप्प झाले. लॉकडाऊनमुळे उद्योग, बाजारपेठा, दळणवळण थांबले. यातून कधी मार्ग निघेल, याबद्दल सारेच साशंक होते; मात्र धीर न सोडता सर्वजण पुन्हा नव्या जोमाने कामाला लागले. ‘उद्योग रडत बसले नाहीत, ते लढत राहिले.’ या संकटातून आपणास बाहेर निघायचे आहे. या संकटावर मात करून पुढे जायचे आहे, याबद्दल उद्योगात काम करणारे सर्वच घटक सांघिक निर्णय घ्यायला लागले. उद्योगातील सर्वच घटकांमध्ये प्रगल्भता आली. पूर्वी स्वत:च्या उद्योगाऐवजी दुसऱ्याने बदल केला, तर माझा फायदा होईल, अशी भावना छोट्या-मोठ्या उद्योगांची होती. आता उद्योग, व्यवसाय वाढीसाठी लोकांनी स्वत:मध्ये बदल करून घेण्यास सुरुवात केली. येणाऱ्या काही दिवसांत त्याचा सकारात्मक परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून येईल. आता संकट कोणतेही आले, तरी त्यातून आपणास मार्ग काढावा लागणार, ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सकारात्मक भावना वाढीस लागली.
उद्योगात आरोग्याची काळजी घेण्याबाबत जागरुकता सर्वांमध्ये आली. आपण मास्क लावला पाहिजे, नियमित हात स्वच्छ धुतले पाहिजेत. सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. गर्दी न करता अंतर राखून काम केले पाहिजे, असे आता प्रत्येकाला वाटते.
‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी सांगितले की, कोरोनाने तथ्य स्वीकारायला शिकवले. उद्योगात बदल करण्याचे धाडसही कोरोनाने शिकवले. दुसरीकडे उद्योगांमध्ये आता हा विचार सुरू झाला आहे की, भविष्यात कोरोनासारखे संकट आले, तर त्यावर किमान दोन-तीन वर्षे तग धरण्यासाठी स्वत:मध्ये बदल करून घेण्याची तयारी सुरू केली आहे. आयटी इंडस्ट्रीच नव्हे, तर मॅन्युफॅक्चरींग कंपन्यांमध्येसुद्धा ‘वर्क फ्राॅम होम’ ही कार्यप्रणाली रुढ होत आहे.