छत्रपती संभाजीनगर : महिला पोलिस कर्मचाऱ्यांची चार पथके स्थापन करून भिमनगर, भावसिंगपुरा भागातील अवैध दारू विक्रेत्यांच्या अड्ड्यावर छापे मारण्यात आले. या चारही पथकानी अवैध दारूच्या साठ्यासह आरोपींना ताब्यात घेतली. ही कारवाई शनिवारी करण्यात आल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. कैलास देशमाने यांनी दिली.
छावणी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार भिमनगर भावसिंगपुरा भागात काही ठिकाणी अवैध दारूची विक्री करण्यात येत होती. त्याठिकाणी केवळ महिला अंमलदारांनाच छापा मारण्यासाठी पाठविण्याचे नियोजन निरीक्षक देशमाने यांनी केले. त्यानुसार पहिल्या पथकात अंमलदार मिना जाधव, अरुणा वाघेरे, दुसऱ्या पथकात सुमन पवार, सविता लोढे, तिसऱ्या पथकात वैशाली चव्हाण आणि चौथ्या पथकात ज्योती भोरे व प्रियंका बडुगे यांची नेमणूक केली. तिसऱ्या पथकातील महिला अंमलदाराच्या मदतीला उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांना देण्यात आले.
चारही पथकांनी भिमनगर भावसिंगपुरा भागात माहिती मिळालेल्या ठिकाणी छापा मारला. त्यातील पहिल्या पथकाने मनोज रामभाऊ राऊत याच्या घरातुन १८० मिलीच्या ४२ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. दुसऱ्या पथकाने आकाश प्रकाश अवसरमोल याच्या घश्री छापा मारीत देशी दारुच्या ३४ बॉटल्या जप्त केल्या. तिसऱ्या पथकाने आशिष रणजित खरात याच्या घरातुनही दारूचा साठा पकडला. चौथ्या पथकाने रोहित कल्लु शिर्के याच्या घरी छापा मारून ३८ देशी दारुच्या बाटल्या जप्त केल्या. या सर्व आरोपींच्या विरोधात छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला. ही कारवाई निरीक्षक कैलास देशमाने यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
छावणीच्या निरीक्षकांचे विविध प्रयोग
छावणी पोलिस ठाण्यात विविध प्रयोग करण्यात येत आहेत. त्यातुनच महिला पोलिस अंमलदारांची पथके स्थापन करून अवैध दारू विक्रेत्यांवर छापे मारण्याची संकल्पना पुढे आली. महिला अंमदारांच्या पथकांना निरीक्षक देशमाने यांच्यासह उपनिरीक्षक पांडुरंग डागे यांनी मदत केली.